धामणे येथील तिहेरी खून प्रकरणात दहा आरोपींना जन्मठेप; वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:14 IST2026-01-14T17:14:20+5:302026-01-14T17:14:58+5:30
- अहिल्यानगर जिल्ह्यातील फासे पारधी टोळीतील ११ आरोपींनी दरोड्याच्या वेळी फाले कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या केली होती.

धामणे येथील तिहेरी खून प्रकरणात दहा आरोपींना जन्मठेप; वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश
वडगाव मावळ : वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे धामणे येथे शेतावर वास्तव्यास असलेल्या फाले कुटुंबावर दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करून तिघांची हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय, वडगाव मावळ यांनी दहा आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
धामणे येथे २०१७ मध्ये घडलेल्या या घटनेत अहिल्यानगर जिल्ह्यातील फासे पारधी टोळीतील ११ आरोपींनी दरोड्याच्या वेळी फाले कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा भारतीय दंड विधानाच्या कलम ३९५, ३९६ व ३९७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक मुगुट भानुदास पाटील यांनी सखोल तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
या प्रकरणाची सुनावणी वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. के. अनभुले यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपी नागेश उर्फ नाग्या भोसले, छोट्या उर्फ बापू काळे, बाब्या उर्फ भेन्या चव्हाण, सेवन उर्फ डेंग्या प्याव लाभ, दिलीप पांडू चव्हाण, सुपार उर्फ सुपऱ्या चव्हाण, राजू तुकाराम शिंगाड, अजय शिवाजी पवार, योगेश बिरजू भोसले आणि दीपक बिरजू भोसले (जामिनावर) यांना दोषी ठरवून एकत्रितरीत्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सरकारतर्फे खटल्यामध्ये विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांची नियुक्ती होती. चौगुले यांनी न्यायालयात खटल्यामध्ये मुख्यत्वे करून कुटुंबातील जखमीची साक्ष, ओळख परेड, वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे याच्यासह एकूण १७ साक्षीदारांची साक्ष घेऊन योग्य पुरावे दिले. तसेच प्रभावीपणे युक्तिवाद केला. न्यायालयाने अभियोग पक्षाचे साक्षी पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून सर्व जेल बंदी नऊ आरोपींना सश्रम जन्मठेप कारावासाची शिक्षा ठोठावली. सहायक पोलिस आयुक्त सचिन कदम, तळेगाव दाभाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, तपास अधिकारी मुगुटलाल पाटील मार्गदर्शनानुसार पोलिस अंमलदार अविनाश गोरे यांनी खटल्यामध्ये पाठपुरावा केला होता.