फुगेवाडी, दापोडी मेट्रो स्थानकापर्यंत जायचं कसं? 'मेट्रो फिडर' बससेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:58 IST2025-10-12T13:57:46+5:302025-10-12T13:58:29+5:30
- बस अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी : शहराच्या दक्षिण-पश्चिम भागांतून दररोज सहा हजार प्रवासी येतात मेट्रोपर्यंत; स्थानकापर्यंत खासगी वाहनांतून प्रवासामुळे भुर्दंड

फुगेवाडी, दापोडी मेट्रो स्थानकापर्यंत जायचं कसं? 'मेट्रो फिडर' बससेवा बंद
अमृता दातीर-जोशी
सांगवी : फुगेवाडी मेट्रो स्थानकापर्यंत प्रवाशांना सोयीस्कर प्रवासासाठी सुरू करण्यात आलेली मेट्रो फीडर बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.
फुगेवाडी मेट्रो फीडर बस सेवा ही "फर्स्ट टू लास्ट माइल कनेक्टिव्हिटी" मजबूत करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) आणि महामेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केली होती. सुरुवातीला मेट्रो सेवा पिंपरी चिंचवड ते जिल्हा न्यायालय या मर्यादित मार्गापर्यंत असल्याने प्रवाशांची संख्या कमी होती. त्यामुळे कमी उत्पन्नाचे कारण देत फुगेवाडी फीडर बससेवा बंद करण्यात आली. मेट्रोचा विस्तार स्वारगेटपर्यंत झाल्याने प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, त्यांना मेट्रोपर्यंत पोहचण्यास अडथळा होत आहे.
सांगवी, नवी सांगवी, दापोडीस दिलासा द्या
सध्या फुगेवाडी आणि दापोडी स्थानकांवर दररोज सुमारे सहा हजार प्रवासी प्रवास करतात. फुगेवाडी फीडर सेवा पुन्हा सुरू झाल्यास सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. सध्या मेट्रो स्थानकांपर्यंत खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते.
एकात्मिक वाहतूक सेवा सक्षम व्हावी, यासाठी मेट्रो कायमच सहकार्याची भूमिका बजावत आली आहे. पीएमपीएलशी समन्वय साधून फुगेवाडी मेट्रो फीडर सेवा लवकरच पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - चंद्रशेखर तांबवेकर, सरव्यवस्थापक (प्रशासन व जनसंपर्क), महामेट्रो, पुणे
फुगेवाडी मेट्रो फीडर सेवेबाबत पीएमपीएल प्रशासन सकारात्मक आहे. सध्या अपुऱ्या बस संख्येमुळे थोडा विलंब होत आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत नवीन बस दाखल झाल्यानंतर या मागणीला प्राधान्य देण्यात येईल. - सतीश गव्हाणे, मुख्य कार्यकारी व्यवस्थापक (वाहतूक, पीएमपीएल)मी नवी सांगवीचा रहिवासी असून, दररोज दापोडी ते रामवाडी असा मेट्रो प्रवास करतो. दापोडी स्थानकापर्यंत बस सुविधा नसल्याने कधी रिक्षा, कधी खासगी वाहन तर अनेकदा पायी जावे लागते. ही सुविधा पुन्हा सुरू झाल्यास आमच्यासारख्या प्रवाशांना मोठी सोय होईल. - मेट्रो प्रवासी, नवी सांगवी