Pimpari-chinchwad : ‘पीएफ’ थकवल्याप्रकरणी महापालिकेने बजावली ठेकेदाराला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:40 IST2026-04-18T14:39:59+5:302026-04-18T14:40:10+5:30
- पगारातून कपात, खात्यात जमा नाही : प्रशासनाने मागवला हिशेब, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवणूक सुधारण्याचेही दिले आदेश

Pimpari-chinchwad : ‘पीएफ’ थकवल्याप्रकरणी महापालिकेने बजावली ठेकेदाराला नोटीस
पिंपरी : महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांच्या पगारातून नियमितपणे भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कपात केली जात असतानाही ठेकेदाराने ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. ‘पीएफ’ कपातीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा ‘लोकमत’ने बुधवारी (दि.१५) उघडकीस आणला होता. हे वृत्त प्रसिद्ध होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.
‘डिव्हाइन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस’ या ठेकेदार कंपनीमार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाली होती. आरोग्य विभागाने संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठवत पीएफ कपातीसंदर्भातील संपूर्ण आर्थिक व्यवहार, कर्मचारीनिहाय तपशील, बँक स्टेटमेंट्स आणि ‘ईपीएफओ’कडे जमा केलेल्या रकमेची अधिकृत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ठरावीक मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
‘पीएफ’चा प्रश्न नेमका काय?
आरोग्य विभागातील विविध सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर कंत्राटी पद्धतीने कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामगारांच्या पगारातून कायद्याने बंधनकारक असलेली पीएफची रक्कम कपात केली जाते. परंतु, ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न करता ती थकवली जात असल्याचा आरोप आहे. कामगारांचे म्हणणे असे की, पगार पावत्यांवर पीएफ कपात दाखवली जाते. मात्र, ईपीएफ खात्यात ती जमा झाल्याची नोंद दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी असलेली सुरक्षितता धोक्यात आली आहे.
नोटिशीमध्ये शुक्ला यांना वर्तवणूक सुधारण्याचे आदेश
नोटिशीत कंपनीचे महाव्यवस्थापक डी. के. शुक्ला यांना स्पष्ट शब्दांत वर्तणूक सुधारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामगारांशी उद्धट वागणूक, तक्रारींकडे दुर्लक्ष तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वयाचा अभाव याबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. जबाबदारीने कामकाज न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
कामगार विभागानेही मागवली माहिती
महापालिकेच्या कामगार विभागानेही संबंधित ठेकेदाराकडून सर्व कामगारांच्या पगार पावत्या, पीएफ कपात, ईपीएफ खात्यातील नोंदी आदी माहिती मागवली असल्याचे मुख्य कामगार अधिकारी प्रमोद जगताप यांनी सांगितले.