मेट्रोतील सुरक्षा रक्षकांचे तीन महिन्यांचे वेतन थकले; ठेकेदारांविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:58 IST2025-10-15T18:58:27+5:302025-10-15T18:58:51+5:30
- पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने घेतली गंभीर दखल

मेट्रोतील सुरक्षा रक्षकांचे तीन महिन्यांचे वेतन थकले; ठेकेदारांविरोधात तक्रार
पिंपरी : वॉरियर सिक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्व्हिसेस, अनंता स्काय इन्फ्राटेक या खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या कंपनीकडून मेट्रोमध्ये कार्यरत अनेक सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवले असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित रक्षकांनी कामगार उपायुक्तांसह पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे. दिवाळीपूर्वी थकीत वेतन देण्याची मागणी या सुरक्षारक्षकांनी केली आहे.
कंपन्यांकडून मेट्रो सेवेतील ४० सुरक्षा रक्षकांचे वेतन प्रलंबित आहे. अनेक सुरक्षारक्षकांना दोन ते चार महिन्यांचे वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काहींना घरभाडे आणि दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. कंपनीकडे वारंवार मागणी करूनही वेतन दिले जात नाही. उलट वेतनाबाबत विचारणा केल्यास धमकीच्या सुरात बोलले जाते, अशी सुरक्षा रक्षकांची तक्रार आहे. ठेकेदार कंपनीने श्रम कायद्याचे उल्लंघन केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. दिवाळीपूर्वी थकीत वेतन देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स (रोजगार व कल्याण) अधिनियमांतर्गत स्थापन केलेल्या पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने या प्रकरणाची दखल घेतली असून, संबंधित कंपनीकडून स्पष्टीकरण मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत संबंधित ठेकेदारांच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही.
यासंदर्भात संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत. दिवाळीपूर्वी सुरक्षारक्षकांना थकीत वेतन मिळेल. -श्रावण हर्डिकर, व्यवस्थापकीय संचालक, मेट्रो
सुरक्षा रक्षकांना थकीत वेतनासह दिवाळी बोनस देण्याच्या सूचना संबंधित ठेकेदार संस्थेला देण्यात येतील. त्यानंतरही सुरक्षा रक्षकांना वेतन न दिल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. - प्रशांत वंजारी, सचिव, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ
कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. काम करूनही वेतन न देणे ही कामगारांच्या हक्कांची पायमल्ली आहे. प्रशासनाने थकीत वेतन आणि बोनस सुरक्षा रक्षकांना मिळवून द्यावेत. -चंद्रकांत कांबळे, संस्थापक अध्यक्ष, बहुजन कर्मचारी कामगार संघटना
दररोज बारा तास काम करूनही तीन महिन्यांपासून वेतन नाही. साप्ताहिक सुटी मिळत नाही. दिवाळीचा बोनसही मिळालेला नाही. याबाबत कामगार उपायुक्तांकडे तक्रार केली आहे.-विजय सांगळे, सुरक्षारक्षक, वाकड