LPG Gas Crisis: कासारवाडीत गॅस सिलिंडरचा अवैध साठा उघड; भारत गॅस एजन्सीवर पुरवठा विभागाचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:15 IST2026-03-15T13:14:57+5:302026-03-15T13:15:31+5:30
पिंपळे भारत गॅस एजन्सीवर छापा टाकत अवैधरित्या साठवलेले ५४ भरलेले आणि २०७ रिकामे असे एकूण २६१ गॅस सिलिंडर जप्त केले.

LPG Gas Crisis: कासारवाडीत गॅस सिलिंडरचा अवैध साठा उघड; भारत गॅस एजन्सीवर पुरवठा विभागाचा छापा
पिंपरी : गॅस सिलिंडरची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने शुक्रवारी कासारवाडी येथील पिंपळे भारत गॅस एजन्सीवर छापा टाकत अवैधरित्या साठवलेले ५४ भरलेले आणि २०७ रिकामे असे एकूण २६१ गॅस सिलिंडर जप्त केले. हा साठा एजन्सीच्या शेजारील गोदामात आढळला.
सध्या शहर आणि जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची कमतरता जाणवत आहे. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालक घरगुती गॅसचा वापर करत असल्याच्या तक्रारी अन्न पुरवठा विभागाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे शहरासाठी दोन आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी दोन विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.
कासारवाडी येथील पिंपळे भारत गॅस एजन्सीबाबत सिलिंडर पुरवठा विलंबाच्या तक्रारी ग्राहकांकडून मिळाल्या होत्या. शिवाय, येथे अवैध राशीत गॅस सिलिंडर साठवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरवठा परिमंडळ अधिकारी विजयकुमार क्षीरसागर यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत प्रदीप डंगारे, वशिष्ठ पांचाळ आणि सुशांत ओव्हाळ यांनी सहभाग घेतला.
तपासादरम्यान, एजन्सीच्या शेजारील एका गोदामात दोन ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सिलिंडर आढळले. एजन्सीचे अधिकृत गोदाम गहुंजे येथे असतानाही शेजारील गोदामात सिलिंडर साठवले असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी भारत पेट्रोलियमचे क्षेत्रीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ अधिकारी विजयकुमार क्षीरसागर यांनी दिली.
तक्रारींसाठी संपर्क क्रमांक :
चिंचवड विधानसभा : ९७६५५८१८१८
पिंपरी विधानसभा : ७८४३०३३४७३
भोसरी विधानसभा : ९८५००६४८४९