मुदत संपली, शहरात साडेसात लाख वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:45 IST2026-01-14T19:44:49+5:302026-01-14T19:45:26+5:30
- पिंपरी-चिंचवड आरटीओत १३.३७ लाख वाहनांपैकी केवळ ४.७४ लाख वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट : आरटीओकडून दंडात्मक कारवाई सुरू

मुदत संपली, शहरात साडेसात लाख वाहनांना ‘एचएसआरपी’ प्लेट नाही
पिंपरी : १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओत १३.३७ लाख वाहनांपैकी केवळ ४.७४ लाख वाहनांना एचएसआरपी प्लेट बसविली आहे. तर तब्बल ७.४९ लाखांहून अधिक वाहने अद्याप एचएसआरपी प्लेटच्या नोंदणीशिवायच आहेत, तर १.१२ लाख वाहनांची नोंदणी झाली असूनही त्यांची प्लेट बसविणे बाकी आहे. ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत संपली असून आरटीओकडून दंडात्मक कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी अनिवार्य करण्याची पहिली मुदत ३१ मार्च २०२५ अशी जाहीर केली होती. त्यानंतर ही मुदत एप्रिल, जून, १५ ऑगस्ट, ३० नोव्हेंबर आणि शेवटी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पाच वेळा वाढविण्यात आली. १ जानेवारी २०२५ पासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यात तीन खासगी कंपन्यांना या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, वाहनचालकांकडून उशीर होत असल्याने हा आकडा वाढलेला नाही.
परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘मुदत संपली असून, पुढील वाढीचा कोणताही प्रस्ताव नाही. लवकरच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू होईल. वाहनचालकांनी तातडीने नोंदणी करावी.’
..............
पिंपरी चिंचवड आरटीओत काय परिस्थिती?
पिंपरी-चिंचवड आरटीओ अंतर्गत २०१९ पूर्वी नोंदणीकृत १३ लाख ३७ हजार ५६ वाहने असून त्यापैकी एचएसआरपी बसविलेली वाहने केवळ ४ लाख ७४ हजार ३७६ आहेत. नोंदणी झाली तरी एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बाकी असलेली वाहने १ लाख १२ हजार ९७३ आहेत.
---------
कशी कराल नोंदणी?
वाहनचालकांनी https://parivahan.gov.in किंवा अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. दुचाकीसाठी ४०० ते ५०० रुपये आणि चारचाकीसाठी ७०० ते ८०० रुपये शुल्क आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत प्लेट बसविली जाते.
........
परिवहन विभागाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदत दिली होती. मात्र, परिवहन विभागाकडून मुदतवाढ संदर्भात कोणतेच आदेश आलेले नाही. २०१९ पूर्वीच्या ४ लाख ७४ हजार ३७६ वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आली आहे. - राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड आरटीओ