शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी

By नारायण बडगुजर | Updated: March 22, 2025 17:57 IST2025-03-22T17:56:45+5:302025-03-22T17:57:09+5:30

गुजरात या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीत १० हजार रुपये गुंतवणूक केल्यास १० लाख रुपयांचे शेअर खरेदी विक्री करण्याची लिमीट भेटेल

pimpari-chinchwad crime14 lakh 42 thousand embezzled under the pretext of investment | शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी

शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतविल्यावर जास्त नफा मिळेल, असे आमिष दाखवले. गुंतवणुकीवरील नफा मिळवण्यासाठी १४ लाख ४२ हजार २५४ रुपये भरण्यास भाग पाडून अपहार केला. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. चिखली येथील जाधववाडीत मार्च ते १२ जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. 

याप्रकरणी जाधववाडी येथील एका व्यक्तीने शुक्रवारी (२१ मार्च) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अमित, डाॅ. चिराग, धवल शहा, धवल शहाचा बाॅस, सल्लागार वरुण, संदीप, ब्रोकर वासूभाई या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी एकमेकांशी संगणमत करून फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. संशयितांनी त्यांची भवानी इंटरप्रायजेस गुजरात या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीत १० हजार रुपये गुंतवणूक केल्यास १० लाख रुपयांचे शेअर खरेदी विक्री करण्याची लिमीट भेटेल अशी आभासी, बनावट, खोटी स्किम सांगून मोबाइल व व्हाटसअपव्दारे फिर्यादीच्या संपर्कात राहिले. गुंतवणुकीवर जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवले. फिर्यादीच्या नावाने बनावट, आभासी खाते उघडून शेअरमध्ये कोणत्याही अटी शर्ती नसल्याचे सांगून खोटे सल्ले दिले. प्रत्यक्षात कोणताही शेअर खरेदी विक्री न करता फिर्यादीला फायदा झाल्याचा खोटा रिपोर्ट तयार करून दिला. नफा मिळवण्यासाठी ब्रोकर चार्ज, जीएसटी चार्ज, नुकसान झालेला चार्ज, होल्ड चार्ज व इतर अशा कारणांकरिता पैसे पाठविण्यास सांगितले. पैसे न पाठविल्यास फिर्यादीचे शेअर मार्केटचे अकाउंट बंद करण्याची व त्यामध्ये असलेले नफ्याचे पैसे फिर्यादीस कधीच मिळणार नाहीत व त्या खात्यामधील शेअर खरेदीविक्री करता येणार नाहीत, असे भय दाखवले. 

फिर्यादीचा विश्वासघात व फसवणूक करून त्यांच्या पैशांचा अपहार केला. फिर्यादीच्या घरी येऊन जिवे ठार मारू, पोलिसांत तक्रार करू, अशी धमकी देऊन फिर्यादीला पैसे पाठविण्यास सांगितले. मात्र, त्यांना गुंवतणूक केलेली रक्कम किंवा त्यावरील नफा  न देता फिर्यादीची १४ लाख ४२ हजार २५४ रुपयांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.

Web Title: pimpari-chinchwad crime14 lakh 42 thousand embezzled under the pretext of investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.