Crime News : भयंकर कृत्य...! जमिनीच्या वादातून भावाच्या घरावर फेकले पेट्रोलबॉम्ब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 10:53 IST2026-03-31T10:53:38+5:302026-03-31T10:53:49+5:30
घराच्या खिडकीच्या काचा फोडून आत पेट्रोलने भरलेल्या आणि सुतळी बॉम्ब चिकटविलेल्या बाटल्या फेकल्या. त्यानंतर लाकडी टेंभा पेटवून घर पेटवून दिले.

Crime News : भयंकर कृत्य...! जमिनीच्या वादातून भावाच्या घरावर फेकले पेट्रोलबॉम्ब
पिंपरी : कौटुंबिक जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून मनात राग धरून एकाने चुलत भावाचे घर पेट्रोलबॉम्बने पेटवून देऊन संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. २९ मार्च) पहाटे तीनच्या सुमारास देहूगाव येथे घडली.
सुनील पंढरीनाथ काळोखे (वय ७४, रा. देहूगाव) यांनी या प्रकरणी देहू रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुदाम किसन काळोखे (६२, रा. देहूगाव) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि संशयित यांच्यात वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून वाद होता. फिर्यादींचे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना संशयिताने घराच्या खिडकीच्या काचा फोडून आत पेट्रोलने भरलेल्या आणि सुतळी बॉम्ब चिकटविलेल्या बाटल्या फेकल्या. त्यानंतर लाकडी टेंभा पेटवून घर पेटवून दिले. यामध्ये फिर्यादी यांच्या घरातील सर्वांना जिवे मारण्याचा संशयिताने प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.