आम्ही इथले भाई आहोत, हप्ता द्यावा लागेल; पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:03 IST2025-09-01T16:02:56+5:302025-09-01T16:03:32+5:30
- इथे पेट्रोल पंप चालवायचा असल्यास आम्हाला पाच हजार हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर पेट्रोल फुकटात भरावे लागेल असे म्हणत त्यांनी पैशाची मागणी केली.

आम्ही इथले भाई आहोत, हप्ता द्यावा लागेल; पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण
पिंपरी : पेट्रोल पंपावर तिघांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण करून हप्त्याची मागणी केली. खेड तालुक्यातील मेदनकरवाडी येथील गवते वस्तीतील पुणे-नाशिक महामार्गावर शनिवारी (दि. ३० ऑगस्ट) रात्री ही घटना घडली.
अतुल अर्जुन तांबे (१९, रा. खंडोबा माळ, चाकण), सोहम श्रीकांत माने (१८, वराळे), ओंकार सुरेश बागल (२०, रा. देहूगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सचिन शिवाजी बिरादार (३०, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पेट्रोल पंपावर काम करत असताना संशयितांनी त्यांच्याकडून ९० रुपयांचे पेट्रोल फुकटात भरून घेतले. त्यानंतर, ‘इथे पेट्रोल पंप चालवायचा असल्यास आम्हाला पाच हजार हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर पेट्रोल फुकटात भरावे लागेल’, असे म्हणत त्यांनी पैशाची मागणी केली.
फिर्यादीने विरोध केल्यावर संशयितांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांचे सहकारी भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. ‘आम्ही इथले भाई आहोत, इथे पंप चालवायचे असल्यास आम्हाला हप्ता द्यावा लागेल,’ असे मोठ्याने ओरडून पंपावर भीतीचे वातावरण निर्माण केले. पेट्रोल पंपावर इंधन भरायला आलेले वाहनचालक घाबरून पळून गेले.