Video : पिंपरीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा; डांगे चौकात अर्धा तास वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:53 IST2026-03-02T12:53:10+5:302026-03-02T12:53:44+5:30
रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा आडवी उभी करून चालकाने सुमारे अर्धा तास धिंगाणा घातल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

Video : पिंपरीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा; डांगे चौकात अर्धा तास वाहतूक ठप्प
पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरातील अत्यंत वर्दळीचा समजला जाणारा डांगे चौक परिसर काल रात्री एका मद्यधुंद रिक्षाचालकाच्या गोंधळामुळे अक्षरशः ठप्प झाला. रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा आडवी उभी करून चालकाने सुमारे अर्धा तास धिंगाणा घातल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, डांगे चौकातील एका हॉटेल समोर ही घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. संबंधित रिक्षाचालक दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याने आपली रिक्षा भररस्त्यात आडवी लावत ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण केला. वाहनांची लांबलचक रांग लागल्याने काही काळासाठी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नागरिकांनी चालकाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र तो आक्रमक पवित्र्यातच असल्याचे सांगण्यात आले. या दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
बघ्यांची गर्दी, प्रवाशांचा खोळंबा
भररस्त्यात सुरू असलेल्या या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जवळपास अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. कार्यालयीन वेळ संपल्यानंतरचा कालावधी असल्याने अनेकांना घरी पोहोचण्यास उशीर झाला.
कारवाईकडे लक्ष
घटनेची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता पोलिसांकडूनया मद्यधुंद चालकावर कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.