छातीत वेदना, ॲसिडिटीचे औषध अन् दोन तासांत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:06 IST2026-01-20T13:05:54+5:302026-01-20T13:06:13+5:30
- डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

छातीत वेदना, ॲसिडिटीचे औषध अन् दोन तासांत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
पिंपरी : छातीत तीव्र वेदना होत असलेल्या तरुणावर हृदयविकाराची शंका असूनही ॲसिडिटीवर उपचार करून घरी पाठवण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औंध जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि. १८) पहाटे घडली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ममतानगर, जुनी सांगवी येथील सुमित श्रीकांत गद्रे सोनावणे ( वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. तक्रारीनुसार, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास सुमितच्या छातीत वेदना सुरू झाल्याने त्याला तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्कालीन कक्षातील कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्याची ‘ईसीजी’तपासणी केली. मात्र, अहवाल सामान्य असल्याचे सांगत हृदयविकाराची शक्यता नाकारण्यात आली.
डॉक्टरांनी छातीतल्या वेदनांना पित्ताचा त्रास असल्याचे निदान करत ॲसिडिटीची गोळी, मळमळ व चक्कर थांबवणारे, तसेच वेदनाशामक इंजेक्शन देऊन काही वेळातच सुमितला घरी पाठवले. घरी गेल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला. नातेवाइकांनी त्याला पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सांगवी पोलिसांनी तक्रार दाखल करून ससून रुग्णालयातील तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह स्वीकारला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात हृदयरोग उपचारांची पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते शरत शेट्टी यांनी केला आहे.
याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील तीन डॉक्टरांची चौकशी समिती नेमण्यात आली असून, दोन-तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक
हृदयविकारतज्ज्ञ केवळ नावालाच आहेत. रुग्णाला तत्काळ सुसज्ज रुग्णालयात किंवा ससून येथे पाठवले असते, तर सुमितचा जीव वाचू शकला असता. - शरत शेट्टी, आरोग्य कार्यकर्ते
सुमितवर वेळेत आणि योग्य उपचार झाले असते, तर तो आज जिवंत असता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा मृत्यू झाला. - विवेक गद्रे, सुमितचा भाऊ