'म्हाडा'च्या अर्जातील पडताळणीवेळी शहरातील अर्जदारांचा उडतोय गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 09:24 IST2026-04-29T09:22:10+5:302026-04-29T09:24:58+5:30
पिंपरी-चिंचवडमध्ये १८२ घरांसाठी योजना : डोमिसाईल, आयटीआर, जात दाखल्यांच्या पडताळणीला विलंब, अर्जदारांची मुदतवाढीची मागणी

'म्हाडा'च्या अर्जातील पडताळणीवेळी शहरातील अर्जदारांचा उडतोय गोंधळ
पिंपरी : ‘म्हाडा’च्या प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी (एफसीएफएस) योजनेंतर्गत सुरू असलेल्या घर अर्ज प्रक्रियेत कागदपत्र पडताळणीच्या टप्प्यावर अर्जदारांचा गोंधळ उडत आहे. ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करूनही अनेकांच्या प्रोफाइलवर पडताळणी सुरू असल्याचा शेरा कायम दिसत असल्याने अर्जदार चिंतेत आहेत. पडताळणी प्रक्रिया म्हाडाकडून केली जात नसून विविध विभागांकडून ऑनलाइन पद्धतीने होत असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (म्हाडा) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील घरांसाठी दि. २३ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विविध गटांतील घरांसाठी स्वतंत्र योजना सुरू असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकडून या योजनेला प्रतिसाद मिळत आहे.
कागदपत्र अपलोड; पण पडताळणी रखडली
अर्ज प्रक्रियेत आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाइल (अधिवास) प्रमाणपत्र, जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, आयटीआर, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, सध्याचा पत्ता, वैवाहिक स्थिती, जोडीदाराची माहिती, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतला आहे का, याची माहिती भरणे बंधनकारक आहे. मात्र, ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर विशेषतः डोमिसाइल, आयटीआर आणि जातीच्या दाखल्यांसमोर पडताळणी सुरू असल्याचा संदेश कायम राहत असल्याने अर्जदारांना पुढील टप्प्यात जाता येत नाही.
यंत्रणांकडून ऑनलाइन पद्धतीने पडताळणी
या संदर्भात ‘म्हाडा’ने स्पष्टीकरण दिले आहे की, संबंधित कागदपत्रांची पडताळणी म्हाडा स्वतः करत नसून विविध विभागांकडून ऑनलाइन प्रणालीद्वारे केली जाते. डोमिसाइलची पडताळणी महाआयटीमार्फत, तर आयटीआरची पडताळणी आयकर विभागामार्फत केली जाते. अन्य कागदपत्रांची पडताळणी संबंधित यंत्रणांकडून ऑनलाइन पद्धतीने केली जाते. त्यामुळे अर्जदारांनी अर्ज भरताना कागदपत्रे अचूक आणि स्पष्ट स्वरूपात अपलोड करावीत, असे आवाहन केले आहे.
‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’मुळे चिंता वाढली
‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ तत्वावर घरे वाटप होणार असल्याने पडताळणी उशिरा झाल्यास घर मिळण्याची संधी गमावण्याची भीती अर्जदार व्यक्त करत आहेत. पडताळणी पूर्ण न झाल्यास अर्ज अंतिम करता येत नसल्याने धास्ती वाढली आहे. मात्र, कोणतीही त्रुटी नसल्यास पडताळणी तातडीने पूर्ण होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
अर्जदारांनी काय काळजी घ्यावी?
- कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करून अपलोड करावीत
- नाव, जन्मतारीख, पत्ता, उत्पन्न यामध्ये तफावत टाळावी
- नियमित लॉगिन करून स्टेटस तपासावे
- त्रुटी असल्यास कागदपत्रे नव्याने अपलोड करावीत
- पडताळणी विलंबित असल्यास हेल्पडेस्कशी संपर्क साधावा
अर्ज पडताळणी ऑनलाइन पद्धतीने केली जाते. महाआयटी, प्राप्तीकर विभाग व संबंधित विभागांकडून ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे अर्ज भरताना काळजीपूर्वक कागदपत्रे सादर करावीत. - राहुल साकोरे, मुख्याधिकारी, म्हाडा