अनधिकृत शाळांचे पेव, पालकांनो, सावध राहा; शिक्षण विभागाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:24 IST2024-12-20T11:24:40+5:302024-12-20T11:24:40+5:30
अनधिकृत शाळांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अनधिकृत शाळांचे पेव, पालकांनो, सावध राहा; शिक्षण विभागाचे आवाहन
पिंपरी :शाळांच्या प्रवेशप्रक्रियांबाबत शहरामध्ये पालकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. अनधिकृत शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेतल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. तसेच अनधिकृत शाळांची यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
शाळा प्रशासनाकडून प्रवेशासाठी विविध प्रकारे जाहिराती केल्या जातात. या जाहिरातीमध्ये शाळा अधिकृत असून, सर्व मान्यता घेतल्या असल्याचा दावा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात काही शाळा अनधिकृत असतानाही पालकांकडून लाखो रुपये शुल्क घेत मुलांना प्रवेश दिला जातो. अशा शाळांमध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. पुणे जिल्ह्यामधील पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, नगरपरिषदा व ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात आयसीएसई, आयबी, सीबीएसई व राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमधून सध्या प्रवेशाचे सत्र सुरू झाले आहे.
ज्या पालकांना विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी शाळांची खातरजमा करावी. शाळेच्या मान्यतेबाबत तालुकास्तरावर, गटशिक्षणाधिकारी व महापालिका, नगरपालिका स्तरावर प्रशासकीय, प्रशासन अधिकारी, नगर परिषद स्तरावर मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, तसेच शाळेला यू-डायस क्रमांक, प्रथम मान्यता, खेळाचे मैदान, स्वच्छतागृह आहे का याची खात्री करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
पालकांनो, हे तपासाच...
आपल्या पाल्याचा प्रवेश घेताना ज्या शाळेमध्ये प्रवेश घेत आहात त्या शाळेला शासकीय मान्यता आहे किंवा नाही? शाळेचा यू-डायस क्रमांक आहे का? शाळेत भौतिक सोयी-सुविधा आहे का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सखी सावित्री समिती स्थापन केली आहे का? शाळेत सीसीटीव्ही आहेत का? शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी केली आहे का? वाहन व्यवस्थेमध्ये महिला कर्मचारी आहेत का? पालक शिक्षक समिती स्थापन केली आहे का?
सर्वांना त्यांच्या कार्यक्षेत्रात एकही अनधिकृत शाळा सुरू राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पालकांनीही शाळांची खातरजमा करूनच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे. - संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद