‘जीबीएस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सतर्क; शहरातील १२ आरओ प्लांट आणि २३ आरओ एटीएमवर कारवाई
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 11, 2025 09:10 IST2025-02-11T09:10:38+5:302025-02-11T09:10:54+5:30
आढळलेल्या ३५ आरओ प्लांट आणि आरओ एटीएमवर सोमवारी (दि. १०) महापालिकेने कारवाई केली.

‘जीबीएस’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सतर्क; शहरातील १२ आरओ प्लांट आणि २३ आरओ एटीएमवर कारवाई
- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खासगी आरओ प्लांट्सची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात आढळलेल्या ३५ आरओ प्लांट आणि आरओ एटीएमवर सोमवारी (दि. १०) महापालिकेने कारवाई केली. संबंधित चालकांना प्लांट तत्काळ बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांनी दिली.
‘जीबीएस’चा प्रादुर्भाव व वाढत्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून खासगी आरओ प्लांट्सच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये अनधिकृत खासगी आरओ वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करून पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले होते. असे दूषित पाणी प्रामुख्याने बोअरवेल्स व उघड्या जलस्त्रोतांमध्ये आढळते.
क्षेत्रीय कार्यालयनिहाय तपासणी
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय या प्लांट्सची तपासणी केली जात आहे. यामध्ये ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय २, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय ५ आरओ प्लांट, तर ३ एटीएम आरओ प्लांट, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय ६ आरओ प्लांट तर ७ एटीएम आरओ प्लांट, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय ५ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय ७ अशा आरओ एटीएम प्लांटचा समावेश आहे.