Mumbai Pune Expressway Traffic : टँकर उलटल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी;पोलिसांनी किवळेतून वळवली वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:25 IST2026-02-05T10:24:35+5:302026-02-05T10:25:45+5:30
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी किवळे, देहूरोड, तळेगाव दाभाडे येथे वाहतूक नियमन केले.

Mumbai Pune Expressway Traffic : टँकर उलटल्याने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी;पोलिसांनी किवळेतून वळवली वाहतूक
-शिवानंद कांबळे
पिंपरी :पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी किवळे, देहूरोड, तळेगाव दाभाडे येथे वाहतूक नियमन केले.
द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे किवळे येथील मुकाई चौकाजवळ द्रुतगती मार्गाच्या प्रवेशाच्या ठिकाणी वाहने थांबविण्यात आली होती. महामार्ग सुरक्षा पोलिसांकडून त्याबाबत सूचना देण्यात येत होत्या. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून महामार्ग पोलिसांना सहकार्य करण्यात येत होते. तसेच देहूरोड वाहतूक विभागातील सेंट्रल चौक, तळेगाव दाभाडे वाहतूक विभागातील सोमाटणे फाटा, वडगाव फाटा चौक येथे वाहतूक पोलिसांकडून बुधवारी (दि. ४) दिवसभर वाहतूक नियमन करण्यात आले.
त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर केला. पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव फाटा चौकात सकाळनंतर काही वेळ वाहनांचा खोळंबा झाला होता. मात्र, तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केल्या. तसेच वाहतूक सुरळीत केली. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे सोशल मीडियावरूनही आवाहन करण्यात आले होते.
‘खाकी’ने जपली माणुसकी
वाहतूक ठप्प झाल्याने कार, बस तसेच इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये प्रवासी ताटकळले होते. त्यांना पाण्याची बाटली, बिस्किट पुडे तसेच अल्पोपाहार वाटप करून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी माणुसकी जपली. प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला.