बळीराजावर दुःखाचा डोंगर! गोठ्याची भिंत कोसळून दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, मावळ तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 21:48 IST2021-07-28T21:46:25+5:302021-07-28T21:48:00+5:30
शेती आणि कुटुंबाचा मोठा आधार असणाऱ्या दोन बैलांना गोठ्याची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीव गमवावा लागला.

बळीराजावर दुःखाचा डोंगर! गोठ्याची भिंत कोसळून दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू, मावळ तालुक्यातील घटना
पुणे : राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. यात पुणे जिल्हाही त्याला अपवाद ठरला नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली तर कुठं दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मावळमध्ये पावसाचा जोर कायम असताना गोठ्याची भिंत कोसळून बळीराजाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेती आणि कुटुंबाचा मोठा आधार असणाऱ्या दोन बैलांना गोठ्याची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत जीव गमवावा लागला.
मावळ परिसरातील सुरु असलेल्या पावसात प्रभाची वाडी येथे बुधवारी पहाटे शेतकरी विठ्ठल जगताप यांच्या गोठ्याची भिंत कोसळली. यात दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. या बैलांच्या मृत्यूमुळे जगताप याच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. पिंट्या आणि बबड्या असं या बैलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विठ्ठल जगताप यांनी आपल्या बैलांना गोठ्यात बांधले होते. चारापाणी करून ते घरी निघून गेले. मात्र बुधवारी पहाटेच्या सुमारास गोठ्याची भिंत कोसळली अन् त्यात या दोन्ही बैलांचा दुर्दैवी बैलांचा मृत्यू झाला. जगताप यांच्या कुटुंबांचं पिंट्या आणि बबड्यावर जीवापाड प्रेम होतं. त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यच समजत असत. मात्र, भिंत अंगावर कोसळून मृत्यू झाला आहे. या संकटसमयी प्रशासनाने आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली आहे.