निगडीतील दरोडाप्रकरणी मुख्य संशयितास अटक; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 20:40 IST2025-07-26T20:40:25+5:302025-07-26T20:40:53+5:30
घरातील कपाट व साहित्य ठेवण्याच्या वस्तू उचकटून सोन्याचांदीचे दागिने, घड्याळ व इतर साहित्य असे सहा लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून दरोडा घातला

निगडीतील दरोडाप्रकरणी मुख्य संशयितास अटक; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या
पिंपरी : बंगल्यात उद्योजकास बांधून पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा घालणाऱ्या टोळीतील एका संशयितास पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. निगडी प्राधिकरणात १९ जुलै रोजी दरोड्याची घटना घडली होती.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरणामध्ये उद्योजकाच्या बंगल्यामध्ये अनोळखी पाच संशयितांनी येऊन पिस्तुलाचा धाक दाखविला. त्यानंतर त्याचे हातपाय चिकटपट्टीने बांधून तोंडावरही चिकटपट्टी लावली. त्यानंतर घरातील कपाट व साहित्य ठेवण्याच्या वस्तू उचकटून सोन्याचांदीचे दागिने, घड्याळ व इतर साहित्य असे सहा लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून दरोडा घातला. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांची पथके तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. त्याप्रमाणे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने परिसरातील दोनशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. संशयितांनी गुन्हा करताना वापरलेल्या गाडीचा शोध घेतला. तसेच तांत्रिक विश्लेषण केले. यावरून मुख्य संशयित निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कार व इतर साहित्य जप्त केले. मुख्य संशयित हा परराज्यातील गंभीर गुन्हे करणारा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक दतात्रय गुळीग, पोलिस अंमलदार महेश खांडे, सोमनाथ मोरे, गणेश सांवत, हर्षद कदम, विनोद वीर, गणेश कोकणे, गणेश हिंगे, नितीन उमरजकर, प्रवीण कांबळे, नितीन लोखंडे, अमोल गोरे, मोहसीन आत्तार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.