गणपती बुकिंगसाठी आईसोबत निघालेल्या मुलीचा मिक्सर ट्रकखाली चिरडून मृत्यू; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 20:21 IST2025-08-23T20:20:50+5:302025-08-23T20:21:31+5:30
आईच्या डोळ्यासमोर झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गणपती बुकिंगसाठी आईसोबत निघालेल्या मुलीचा मिक्सर ट्रकखाली चिरडून मृत्यू; गुन्हा दाखल
पिंपरी -हिंजवडी परिसरात एक हृदयद्रावक अपघात घडला. गणपतीचे बुकिंग करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या ११ वर्षांच्या मुलीला सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकने चिरडले. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव प्रत्युषा संतोष बोराटे (वय ११) असे असून ती आपल्या आईसोबत गणपतीचे बुकिंग करण्यासाठी जात होती. यावेळी मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर प्रत्युषा रस्त्यावर पडली आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली चिरडली गेली. आईच्या डोळ्यासमोर झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर हिंजवडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मिक्सर ट्रक चालक फरहान मुन्नू शेख, ट्रक मालक प्रदीप मारुती साठे आणि सुपरवायझर प्रसाद मंडलिक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी दिली.
दरम्यान, प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. माझ्या मुलीचा खून बिल्डर आणि त्याच्या ट्रक चालकामुळे झाला. त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. कठोर कारवाई न झाल्यास आम्हाला न्याय मिळणार नाही. नसेल जमले तर माझाही जीव घ्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया मृत मुलीच्या आई-वडिलांनी व्यक्त केली. हिंजवडी व आसपासच्या आयटी नगरीत गेल्या काही वर्षांपासून अवजड वाहनांमुळे अनेक अपघात घडले असून, अनेकांनी प्राण गमावले आहेत. मात्र या घटनेनंतर पोलिसांनी अशा वाहनांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. हिंजवडी परिसरात बेदरकारपणे धावणाऱ्या अवजड वाहनांवर आता कठोर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.