पिंपरी : ‘दोन छोट्या मुलांना घेऊन मध्यरात्री बाहेर पडायचं…दरवर्षी हा अनुभव. आता थकलो आहोत. महापालिकेने आम्हाला कायमचा दिलासा द्यावा. दरवर्षी खर्च सांभाळायचा की जागा बदलायची, हेच कळेनासं झालंय…इतक्या वर्षांनंतरसुद्धा आज आमच्या आरोग्याचा, सुरक्षेचा विचार कोणी करत नाही का?,’ अशा शब्दांत पूरग्रस्त नागरिकांनी ‘लोकमत’कडे आपली खंत व्यक्त केली.
पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांना पूर आला की, या नद्यांच्या काठावरील वस्त्यांमध्ये दरवर्षी पाणी शिरते. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांचे जगणे असह्य बनले आहे. विशेष म्हणजे, सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस पडला, तरी महापालिकेला या परिसरातील नागरिकांचे मध्यरात्री स्थलांतर करावे लागते.
तात्पुरता नको, कायमस्वरूपी उपाय करा...
मागील तीन वर्षांत सुमारे १२ वेळा स्थलांतर केले आहेत. यातील वृद्ध व महिलांना स्थलांतराच्या काळात सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने गतवर्षी तात्पुरत्या स्वरूपातील पूरनियंत्रण उपाययोजना केल्या होत्या. मात्र, त्याचा परिणाम फारसा न दिसल्याने यंदा नागरिकांकडून ‘तात्पुरत्या नव्हे, तर कायमस्वरूपी उपाय करा,’ अशी मागणी नागरिक करीत आहेत.
या भागात शिरले पाणी...
पिंपरी-चिंचवड शहरातील नदीपात्रापासून जवळ असणाऱ्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील भाटनगर परिसर, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील लेबर कॅम्प, किवळे, केशवनगर, जाधव घाट, काळेवाडी, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे निलख पंचशीलनगर, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील रामनगर बोपखेल, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील संजय गांधी नगर, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील पिंपळे गुरव लक्ष्मीनगर या भागात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागावर लक्ष केंद्रित केले आहे.
इतरांनी बेकायदेशीर बांधकामे केली, नाल्यांवर अतिक्रमणे केली आणि शिक्षा मात्र आमच्या नशिबी येते! यावर कधी तरी कायमस्वरूपी तोडगा निघणार का, की आम्ही दरवर्षी पावसाळ्यात स्थलांतरच करत राहायचं का?- सारिका जाधव, पूरग्रस्त
पवना नदीतील भराव टाकून केलेली अनधिकृत बांधकामे, वळवलेले नाले यामुळे थोडा जरी पाऊस आला की घरात पाणी शिरत आहे. यावर फक्त कारवाई करण्याचे फक्त आश्वासन महापालिका देते. मात्र, यावर कारवाई कधी होतच नाही.- विशाल चव्हाण, पूरग्रस्त
आम्ही जन्मापासून या ठिकाणी राहत आहोत. याआधी कितीही पाऊस पडला तरीही पूर येत नव्हता; मात्र गेल्या काही वर्षांत थोडा पाऊस पडला तरीही लगेच नदीला पूर येतो. आता आमची घरे निळ्या पूररेषेत असल्याची सांगितली जात आहे. आमची घरे गेली तीस-पस्तीस वर्षे झाली आहेत. निळी पूररेषा नंतर आली. यावर प्रशासनाने तोडगा काढावा.- सुनंदा पाटील, पूरग्रस्त
महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा
पिंपरी चिंचवडमधील पूरस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. महापालिका प्रशासन अत्यंत सज्ज आहे आणि पोखरलेल्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असल्यास कृपया महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका