'शिक्षण एवढे मग हे काम कसे करू...' पोस्टमनचे काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांची मानसिकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 10:00 IST2022-07-19T09:59:47+5:302022-07-19T10:00:00+5:30
पोस्टमन पदासाठी उच्चशिक्षित मुले करताहेत अर्ज

'शिक्षण एवढे मग हे काम कसे करू...' पोस्टमनचे काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांची मानसिकता
पिंपरी : पोस्टमन पदासाठी शैक्षणिक पात्रता अवघी दहावी, बारावी पास आहे. मात्र, बेरोजगारीच्या काळात सरकारी नोकरी म्हणून बीएस्सी, बीटेक, इंजिनिअर झालेले तरुण-तरुणी या पदासाठी अर्ज करतात. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची निवड होते. परीक्षा देताना आपण कोणत्या पदासाठी निवडले गेले आहोत, याची माहिती त्यांना असते. मात्र, काम करताना आपले शिक्षण एवढे झाले आहे त्यामुळे हे काम कसे करू, अशी मानसिकता निर्माण झाल्याने हे काम सोडले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
पिंपरी पोस्टात काम करणाऱ्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या दोन पोस्टमन तरुणींनी कामाच्या अवघ्या दीड महिन्यांत राजीनामा दिला.
पोस्टमन पदासाठी झालेल्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून एमपीएससी तसेच यूपीएससीचा अभ्यास करणारे तरुण, तरुणी यश मिळवितात. मात्र, अपेक्षेप्रमाणे पोस्ट न मिळाल्याने किंवा काम करताना यापेक्षा मोठी संधी आपल्याला मिळेल. म्हणून निवड झालेले तरुण-तरुणी दुसरी संधी शोधत असल्याचे सांगितले जात आहे.
कर्मचाऱ्यांची कमतरता नाही
पोस्टाकडून दरवर्षी नोकरीभरती केली जाते. त्यामुळे काहीजण जरी नोकरी सोडून जात असले तरी नव्याने दुसरे कर्मचारी रुजू होत असतात त्यामुळे काम करताना कर्मचाऱ्यांचा तुटवडा नसतो, असे पिंपरी पोस्ट कार्यालयाचे जनसंपर्क डाक निरीक्षक नितीन बने यांनी सांगितले.