Video: डंपर उलटला अन् तरुण थोडक्यात बचावला; जीवितहानी टळली, पिंपरी चिंचवड मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:50 IST2025-10-11T15:49:27+5:302025-10-11T15:50:49+5:30
डंपरचे मागील चाक तुटलेल्या चेंबरच्या झाकणात अडकल्याने तोल जाऊन तो उलटला

Video: डंपर उलटला अन् तरुण थोडक्यात बचावला; जीवितहानी टळली, पिंपरी चिंचवड मधील घटना
नेहरूनगर (पिंपरी चिंचवड): संत तुकाराम नगर परिसरातील यशवंत चौका जवळ भरवस्तीत शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एक डंपर उलटल्याची घटना घडली. डंपर उलटल्यामुळे शेजारी असलेल्या गॅरेजसमोर उभ्या दोन दुचाक्यांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४२ टी-०५६३ हा डंपर चालक स्वप्निल काकडे हा डस्ट घेऊन यशवंत चौक परिसरातून जात असताना रस्त्यावर असलेल्या स्ट्रॉंमवॉटर वाहिनीवरील झाकण तुटल्यामुळे हा अपघात झाला. अचानक मागील चाक झाकणात अडकल्याने डंपरचा तोल गेल्याने तो उलटला. डंपर रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यानंतर क्रेन च्या साह्याने चेंबरच्या खड्ड्यात अडकलेल्या डंपरला बाहेर काढण्यात आले.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी असलेल्या स्ट्रॉंम वॉटर चे चेंबरचे झाकण गेल्या अनेक दिवसांपासून सुटलेल्या अवस्थेत होते. या धोकादायक परिस्थितीबाबत शिवसेनेचे पिंपरी चिंचवड महानगर प्रमुख राजेश वाबळे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यांनी सांगितले की, “चेंबर झाकण दुरुस्तीबाबत महापालिकेच्या ‘सार्थी’ यंत्रणेकडे तीन वेळा तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर अपघात घडला.” स्थानिक नागरिकांनीही महापालिकेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. चौकातील तुटलेली झाकणे, असमान रस्ते आणि धोकादायक खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.