Traffic Rules: मोबाइलवर बोलत वाहन चालवताय? अपघाताचा धोका, दंडही लई मोठा...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 13:09 IST2023-02-08T13:08:40+5:302023-02-08T13:09:10+5:30
पोलिसांनी २०२२ मध्ये अशा १५,६४८ वाहनचालकांवर कारवाई करीत २ कोटींचा दंड आकारला

Traffic Rules: मोबाइलवर बोलत वाहन चालवताय? अपघाताचा धोका, दंडही लई मोठा...!
पिंपरी : वाहने चालवताना मोबाइल वापरण्यावर बंदी असली तरीही हजारो वाहनचालकांकडून त्याकडे सर्रासपणे कानाडोळा केला जात आहे. यातून अपघाताचा धोका आहे. तसेच अशा वाहनचालकांवर दंडदेखील आकारण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक पोलिसांनी गेल्यावर्षी २०२२ मध्ये अशा १५,६४८ वाहनचालकांवर कारवाई करीत २ कोटी ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड आकारला.
मोबाइलवर बोलताना आढळाल तर जबर दंड
सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार मोबाइलवर बोलत दुचाकी चालविल्यास एक हजार रुपये, चारचाकी वाहन चालकाला दोन हजार रुपये, तर अन्य वाहनचालकाला चार हजार रुपये दंड आकारण्याचा नियम आहे.
वर्षभरात २८ लाख १८ हजार वसूल
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी २०२२ या वर्षभरात मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकांवर आकारलेल्या दंडापैकी २८ लाख १८ हजारांचा दंड वसूल केला.
कारवाई सुरूच राहणार
वाहने चालवताना मोबाइलवर बोलण्यामुळे एकाग्रता भंग होते, अपघाताची शक्यता बळावते. म्हणूनच वाहन चालविताना मोबाइल वापरास मनाई आहे. त्याबाबत नियम करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालविताना मोबाइल वापरणाऱ्या चालकांवर ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. - सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा पिंपरी-चिंचवड
मोबाइल टाॅकिंगप्रकरणी २०२२ मध्ये वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई
एकूण केसेस - १५६४८
एकूण दंड - २,०३,१२,५०० रुपये
एकूण पेड केसेस - २०९०
एकूण वसूल दंड - २,८,१८,००० रुपये