दारूसाठी चक्क पत्नीकडून पैशाची मागणी; विष प्राशन करून पतीने उचलले टोकाचे पाऊल

By नारायण बडगुजर | Published: January 21, 2024 05:18 PM2024-01-21T17:18:55+5:302024-01-21T17:20:03+5:30

पतीचे स्वतःची कंपनी सुरु करण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले

Demanding money from wife for alcohol The husband took the extreme step of consuming poison | दारूसाठी चक्क पत्नीकडून पैशाची मागणी; विष प्राशन करून पतीने उचलले टोकाचे पाऊल

दारूसाठी चक्क पत्नीकडून पैशाची मागणी; विष प्राशन करून पतीने उचलले टोकाचे पाऊल

पिंपरी : विवाहितेने दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी केली. त्यावरून विवाहितेने आणि तिच्या बहिणीने छळ केला. त्याला कंटाळून पतीने आत्महत्या केली. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी विवाहिआ आणि तिच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली.

नारायण मधुकर निर्वळ (वय ३५), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर मधुकर निर्वळ (३९, रा. सोमठाणा, ता. मानवत, जि. परभणी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २०) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नारायण निर्वळ यांची पत्नी आणि तिची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण निर्वळ हे ॲनिमेशन क्षेत्रात कार्यरत होते. काही मित्रांसोबत मिळून ते एका कार्यालयातून ॲनिमेशनचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या पत्नीला देखील काही दिवसांपूर्वी ‘वर्क फ्राॅम’ मिळाले होते. दरम्यान, नारायण यांची पत्नी आणि तिची बहीण यांनी नारायण यांच्याकडे दारू पिण्यास पैशांची मागणी केली. तसेच नारायण यांच्या पत्नीची बहीण ही पत्नीच्या चुकीच्या वर्तणुकीस प्रोत्साहन द्यायची. नारायण यांच्याशी वारंवार भांडणे करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. याला कंटाळून नारायण यांनी १७ जानेवारी रोजी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शनिवारी (दि. २०) शवविच्छेदन झाले. 

नारायण निर्वळ यांनी मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याबाबत भाऊ ज्ञानेश्वर निर्वळ यांना फोनवरून मेसेज केले होते. त्यावरून ज्ञानेश्वर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नारायण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नारायण यांची पत्नी आणि तिची बहीण या दाेघींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालायने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस उपनिरीक्षक सोहन धोत्रे तपास करीत आहेत. 

कंपनी सुरू करायचे स्वप्न अधुरेच...

नारायण निर्वळ यांचा ॲनिमेशन क्षेत्रात हातखंडा होता. काही जणांसोबत ते भागीदारीमध्ये काम करीत होते. त्यासाठी एक छोटे कार्यालय होते. या कामाला मोठे स्वरुप देत स्वत:ची कंपनी सुरू करण्याचे नारायण यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले.

Web Title: Demanding money from wife for alcohol The husband took the extreme step of consuming poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.