हेलिकॉप्टरने स्वस्तात चारधाम यात्रा; ज्येष्ठांना आमिष, ५४ भाविकांची लाखो रुपयांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:17 IST2025-12-27T18:17:14+5:302025-12-27T18:17:23+5:30
हेलिकॉप्टरसाठी अतिरिक्त प्रत्येकी १५ हजार रुपये घेऊनही त्यांना सेवा दिली नाही

हेलिकॉप्टरने स्वस्तात चारधाम यात्रा; ज्येष्ठांना आमिष, ५४ भाविकांची लाखो रुपयांची लूट
पिंपरी : हेलिकॉप्टरने चारधाम यात्रा स्वस्तात घडवून आणण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची ११ लाख ८५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ३० नोव्हेंबर २०२३ ते २५ डिसेंबर २०२५ दरम्यान आनंद हास्य क्लब, बाळासाहेब कुंजीर स्टेडियम, पिंपळे सौदागर येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रनाथ हजारीराम जस्वाल (काटे वस्ती, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भक्ती दर्शन टूर्सचे योगेश प्रभाकर देशमुख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुखने फिर्यादी आणि त्यांच्या हास्य क्लबमधील इतर ५२ लोकांकडून प्रत्येकी ४५ हजार रुपये घेतले. ५४ लोकांपैकी २८ लोकांना तो यात्रेला घेऊन गेला. मात्र, त्यातील १६ लोकांकडून हेलिकॉप्टरसाठी अतिरिक्त प्रत्येकी १५ हजार रुपये घेऊनही त्यांना सेवा दिली नाही. उर्वरित २६ पैकी ५ लोकांचे पैसे परत केले, पण २१ लोकांचे ९ लाख ४५ हजार रुपये आणि हेलिकॉप्टरचे २ लाख ४० हजार रुपये असे एकूण ११ लाख ८५ हजार रुपये परत न करता फसवणूक केली. सांगवी पोलिस तपास करत आहेत.