भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By प्रकाश गायकर | Updated: April 26, 2024 19:18 IST2024-04-26T19:17:19+5:302024-04-26T19:18:21+5:30
अपघात झाल्यानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पळून गेला

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : भरधाव टँकरने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना १२ एप्रिल रोजी दुपारी मारुंजी चौक, मारुंजी येथे घडली. याप्रकरणी २५ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष रामा दगडे (वय ३६, रा. बारणे चाळ, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी बापू रामा दगडे (३८) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टँकर (एमएच ४६/एएफ ७५०९) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचे भाऊ सुभाष दगडे हे त्यांच्या दुचाकीवरून नेरे दत्तवाडी येथे जात होते. मारुंजी चौकात आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या टँकरने धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन सुभाष दगडे यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.