दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट क्रिकेट सामन्यावर सट्टा; सहा जणांना ठोकल्या बेड्या
By नारायण बडगुजर | Updated: April 24, 2025 18:26 IST2025-04-24T18:26:36+5:302025-04-24T18:26:48+5:30
पोलिसांनी आरोपींकडून ४ लॅपटॉप, १८ मोबाईल फोन असा एकूण पाच लाख २० हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केला

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट क्रिकेट सामन्यावर सट्टा; सहा जणांना ठोकल्या बेड्या
पिंपरी : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स संघा विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट संघांमधील क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन माध्यमातून सट्टा लावणाऱ्या सहा जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. हिंजवडी येथे मंगळवारी (२२ एप्रिल) रात्री पावणे दहाच्या सुमारास ही कारवाई केली.
अंकुश यशवंत कुशवाह (२९), विक्रम ललित झा (२५), विकास गोविंद पारधी (२४), आयुष कुमार झा (२६), गौरव शिवराम ठेंगरी (२६, सर्व रा. हिंजवडी), प्रेमकुमार ईश्वरदास राजवाणी (५२, रा. मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार गणेश मेदगे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आयपीएल सिझन सुरू आहे. मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉईंट या दोन संघांमध्ये क्रिकेट सामना झाला. या सामन्यावर हिंजवडी येथील एका सोसायटीमधील फ्लॅटमध्ये ऑनलाईन माध्यमातून सट्टा घेतला जात होता. याबाबत माहिती मिळाली असता क्रिकेट मॅच सुरू असतानाच पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी चार लॅपटॉप, १८ मोबाईल फोन असा एकूण पाच लाख २० हजार ६१० रुपयांचा ऐवज जप्त केला. संशयितांकडे दुसऱ्यांच्या नावांवर रजिस्टर असलेले सिमकार्ड आढळून आले.