पॅन्टच्या खिशात, कपड्यांवर उत्तरांच्या चिठ्ठ्या; पोलीस भरती परीक्षेत ‘स्मार्ट’ कॉपीचा प्रयत्न; तरुणीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:22 IST2026-03-16T18:04:42+5:302026-03-16T18:22:50+5:30
परीक्षेपूर्वी परीक्षार्थ्यांची तपासणी सुरू असताना तरुणीच्या जिन्स पॅन्टच्या खिशात आणि कपड्यांवर उत्तरांच्या चिठ्ठ्या चिटकवल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले.

पॅन्टच्या खिशात, कपड्यांवर उत्तरांच्या चिठ्ठ्या; पोलीस भरती परीक्षेत ‘स्मार्ट’ कॉपीचा प्रयत्न; तरुणीवर गुन्हा दाखल
पिंपरी : पोलिस भरती प्रक्रियेअंतर्गत ताथवडे येथील श्री बालाजी विद्यापीठात रविवारी (दि. १५ मार्च) परीक्षा झाली. यात एका महिलापरीक्षार्थीने कपड्यांवर आणि खिशात चिठ्ठ्या लपवून कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनुजा दिलीप चव्हाण (वय २५, रा. उंडाळे, ता. कराड, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिस अंमलदार अर्चना नवनाथ सस्ते यांनी यासंदर्भात साेमवारी (दि. १६ मार्च) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस दलासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पोलिस भरतीसाठी रविवारी (दि. १५) लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ताथवडे येथील बालाजी विद्यापीठातील परीक्षा केंद्रावर रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास परीक्षेपूर्वी परीक्षार्थ्यांची तपासणी सुरू होती. त्यावेळी अनुजा चव्हाण हिच्या जिन्स पॅन्टच्या खिशात आणि कपड्यांवर उत्तरांच्या चिठ्ठ्या चिटकवल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. शासकीय परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वाकडचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे तपास करीत आहेत.
उशिरा पोहचल्याचा फटका
पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी काही परीक्षार्थी रविवारी परीक्षा केंद्रावर वेळेत पाेहचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळू शकला नाही. उशिरा पोहचल्याने त्यांना लेखी परीक्षेला मुकावे लागले. परीक्षार्थींना मुक्कामासाठी व्यवस्था केली होती, असे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगितले.