जुगारात तरुणाची ५ एकर शेती गेली; हरलेले पैसे जिंकण्यासाठी चोरी, सख्ख्या बहिणीचे दागिने लंपास
By नारायण बडगुजर | Updated: January 16, 2025 17:15 IST2025-01-16T17:14:11+5:302025-01-16T17:15:19+5:30
बहिणीच्या घरी राहून तो डिलिव्हरी बॉयचे काम करत होता, एक कोण घरात नसताना त्याने चोरी केली

जुगारात तरुणाची ५ एकर शेती गेली; हरलेले पैसे जिंकण्यासाठी चोरी, सख्ख्या बहिणीचे दागिने लंपास
पिंपरी : जुगारासाठी तरुणाने पाच एकर शेती विकली. त्यानंतर जुगार खेळून हरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी त्याने आणखी जुगार खेळण्यास सुरुवात केली. तिथे पैसे कमी पडू लागले म्हणून त्याने सख्ख्या बहिणीच्या घरातून साडेबारा तोळे सोने चोरले.चोरीबाबत तक्रार देण्यासाठी तो बहिणीसोबत पोलिस ठाण्यात देखील गेला. पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
श्रीकांत दशरथ पांगरे (२९, रा. कुंभेजळगाव, ता. गेवराई, बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी रोजी वाल्हेकरवाडी येथील एका सोसायटीमधून भर दिवसा साडेबारा तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा चिंचवड पोलिस ठाण्यात दाखल केला. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. यातील फिर्यादी महिला मेडिकल दुकान चालवीत असून त्यांचे पती नोकरीसाठी दिवसभर बाहेर असतात. फिर्यादी महिलेकडे चार महिन्यांपासून त्यांचा भाऊ राहण्यासाठी आला होता. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. घरात कोणतीही तोडफोड झाली नसल्याने ही चोरी घरातीलच सदस्याने केल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलिसांनी श्रीकांत पांगरे याच्याबद्दल माहिती घेतली. श्रीकांत याला जुगार खेळण्याची सवय आहे. त्याने गावाकडील पाच एकर शेत जमीन विकून त्यातून मिळालेले पैसे जुगारात हरले. त्यानंतर जुगारात हरलेली रक्कम पुन्हा ऑनलाईन जुगार खेळून लोकांची उधारी देण्यासाठी तो पुण्यामध्ये आला. चिंचवड येथे बहिणीच्या घरी राहून तो डिलिव्हरी बॉयचे देखील काम करत होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक गणेश माने, सहाय्यक उपनिरीक्षक प्रमोद वेताळ, पोलिस अंमलदार जयवंत राऊत, देवा राऊत, अतिश कुडके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दरवाजा उघडा ठेवून चोरी
श्रीकांत याने १३ जानेवारी रोजी घराचा मागील दरवाजा कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने उघडा ठेवला. त्यानंतर दुपारी घरी कोणी नसताना दरवाजातून घरात आला. घरातून त्याने साडेबारा तोळे वजनाचे दागिने चोरले. चोरी करून तो गावी जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून नऊ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.