रेडिरेकनर दरात ६.६९ टक्के वाढ! पिंपरी चिंचवडमधील घरांच्या किंमती वाढणार, उच्च दर्जाच्या बांधकामांना पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:05 IST2025-04-02T12:05:02+5:302025-04-02T12:05:40+5:30
रेडिरेकनर दर वाढल्याने चांगल्या दर्जाची घरे देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडे खरेदी करणाऱ्यांचा कल वाढणार

रेडिरेकनर दरात ६.६९ टक्के वाढ! पिंपरी चिंचवडमधील घरांच्या किंमती वाढणार, उच्च दर्जाच्या बांधकामांना पसंती
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील वार्षिक बाजारमूल्य दरामध्ये (रेडिरेकनर) वाढ झाली आहे. पुण्यात सरासरी ४.१६ टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यापेक्षा पिंपरी-चिंंचवड महापालिका क्षेत्रातील घरांचे आणि जमिनींचे दर चढेच राहणार असल्याची माहिती बांधकाम व्यवसायिकांनी दिली.
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सोमवारी रेडिरेकनर दरात वाढ करण्यात आली. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू केली आहे. कोरोना संकटामुळे १ एप्रिल २०२० ऐवजी सप्टेंबर २०२० मध्ये रेडिरेकनर दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर २०२१-२२ मध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेडिरेकनर दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन रेडिरेकनर दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते. मात्र, आगामी आर्थिक वर्षासाठी १ एप्रिलपासून रेडिरेकनर दरात वाढ होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार यावर्षी रेडिरेकनर दर वाढले आहेत. उच्च दर्जाच्या घरांना ग्राहक पसंती देतील, असा विश्वास बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला.
घरांच्या मागणीत वाढ
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ६.६९ टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडचा झपाट्याने विकास होत आहे. या महापालिका हद्दीत असलेल्या औद्योगिक कंपन्या, माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांचे जाळे यामुळे या भागातील सदनिकांची मागणी वाढली आहे. त्याचा परिणामही पिंपरी-चिंचवडमधील रेडिरेकनर दरावर दिसून आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात रेडिरेकनर दरात वाढ झाली आहे.
शासनाने रेडिरेकनर दर वाढविले आहेत. त्यामुळे जे विकासक प्रामाणिकपणे काम करीत आहेत, त्यांच्या घरांना ग्राहकांची मागणी वाढली आहे. रेडिरेकनर दर वाढल्याने चांगल्या दर्जाची घरे देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडे खरेदी करणाऱ्यांचा कल वाढणार आहे. - नरेश वासवाणी, संचालक, लिगसी लाइफ स्पेसेस
रेडिरेकनर दर वाढल्याने घरांच्या किमती वाढणार आहेत. प्रत्येक परिसराचा दर वेगळा असल्याने परिसरानुसार घरांच्या खरेदीवरही परिणाम होणार आहे. तसेच घराला लागणाऱ्या साहित्यांचे दरही वाढले आहेत. - प्रकाश छाजेड, संचालक, वर्धमान ग्रुप
रेडिरेकनर दर वाढवल्यामुळे घरांच्या किमतीवरही परिणाम होणार आहे. मात्र, पर्यावरण क्लिअरन्स प्रमाणपत्राअभावी काही प्रकल्प तसेच पडून आहेत. त्याबाबतही शासनाने विचार केला पाहिजे. - अजय विजय, संचालक, शाकुंतल ग्रुप
रेडिरेकनर दर वाढविले आहेत. मात्र, नोंदणीसाठीचे दर ‘जैसे थे’च ठेवले आहेत. जमिनीच्या, घरांच्या किमती वाढतील. पिंपरी-चिंचवड शहरात तुलनेने रेडिरेकनर दर कमी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांची घरांच्या खरेदीला पसंती मिळणार आहे. - दिनेश गोयल, संचालक, गोयलगंगा ग्रुप