बैल आणण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू; वडगाव-मावळमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 15:57 IST2021-10-06T15:57:36+5:302021-10-06T15:57:44+5:30
मुलगा बैलपोळा असल्याने मंगळवारी सायंकाळी हा बैल आणण्यासाठी गेला

बैल आणण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू; वडगाव-मावळमधील घटना
वडगाव - मावळ: वडगाव मावळात बैल आणण्यासाठी गेलेल्या मुलाच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज भरत देशमुख (वय १४) असं या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बैलपोळा असल्याने मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राज देशमुख हा बैल आणण्यासाठी गेला असता वीज पडल्याचा मोठा आवाज झाल्याने राजचे वडील भरत देशमुख यांनी जाऊन पाहिले. त्यावेळी खांडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली राज हा पडलेला आढळून आला.
जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या कानातून व नाकातून रक्त आले होते. डोक्यावरचे केस जळाले होते. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विलास भोसले, उपनिरीक्षक विजय वडोरे,किरण नांगरे,सिध्दार्थ वाघमारे, सचिण काळे घटनास्थळी भेट दिली. वीज पडल्याचे लक्षात आल्याने कान्हे फाटा येथील ग्रामीण रूग्णांलयात उपचारासाठी घेऊन गेले असता डाॅक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर मृत्यू झाल्याचे घोषित केले.
नुकसान भरपाई मिळणार
''आम्ही घटनेचा पंचनामा केला आहे. शासकीय डाॅक्टरांनी अहवाल राखून ठेवला आहे. तो अहवाल येताच शासनाच्या वतीने कुटुंबियांना ४ लाख रूपये देण्यात येणार आहे असे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी सांगितले.''