Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:06 IST2025-12-01T18:01:11+5:302025-12-01T18:06:40+5:30

ज्यांना पार्टनरसोबत नववर्षाच्या स्वागताचा खास आणि शांत अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी मुंबईजवळ अनेक सुंदर आणि रोमँटिक ठिकाणे आहेत.

आता लवकरच २०२५ हे वर्ष संपून नववर्षाचा उत्साह सुरू होईल. 'न्यू इअर' सेलिब्रेशन म्हटलं की, अनेकांच्या मनात गोव्याचा विचार येतो, तर काही जण घराबाहेर न पडता घरीच पार्टीचा बेत आखतात. पण ज्यांना पार्टनरसोबत नववर्षाच्या स्वागताचा खास आणि शांत अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी मुंबईजवळ अनेक सुंदर आणि रोमँटिक ठिकाणे आहेत.

मुंबईची धावपळ सोडून, जर तुम्ही कमी वेळेत आणि बजेटमध्ये आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत शांत, सुंदर वातावरणात ३१ डिसेंबरची रात्र साजरी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेली अशी '५' रोमँटिक ठिकाणं जी नववर्षाच्या स्वागतासाठी एकदम परफेक्ट आहेत.

लोणावळा-खंडाळा : लोणावळा आणि खंडाळा हे मुंबईकरांचे सदाबहार आवडते ठिकाण आहे. इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असली तरी, नववर्षाच्या निमित्ताने अनेक व्हिला आणि प्रायव्हेट रिसॉर्ट्समध्ये सुंदर पार्ट्यांचे आयोजन केले जाते. टायगर पॉईंट, भुशी डॅम आणि कार्ला गुंफा यांसारख्या ठिकाणी फिरून तुम्ही संध्याकाळी पार्टनरसोबत शांत व्हिलामध्ये नववर्षाचे स्वागत करू शकता. मुंबई-पुण्याजवळ असल्याने इथे पोहोचणे खूप सोपे आहे.

माथेरान : माथेरान हे महाराष्ट्रातील एकमेव 'नो-व्हेईकल झोन' हिल स्टेशन आहे. म्हणजे इथे कोणत्याही गाड्यांना प्रवेश नाही, त्यामुळे हवा एकदम शुद्ध आणि शांत असते. पार्टनरसोबत इथे पायी फिरणे, पॉईंट्सवरून सूर्यास्त पाहणे किंवा 'टॉय ट्रेन'मध्ये बसून प्रवास करणे, हा अनुभव खूपच खास असतो. माथेरानमध्ये अनेक जुनी, सुंदर हॉटेल्स आहेत, जी 'न्यू इअर' सेलिब्रेशनसाठी उत्तम पर्याय ठरतात.

दापोली : दापोली हे कोकणातील एक शांत ठिकाण आहे. येथील हर्णे बंदर, लांब समुद्र किनारे आणि डॉल्फिन दर्शन हे इथले खास आकर्षण आहे. इथे तुम्हाला गोव्यासारखी गर्दी जाणवणार नाही. दापोलीमध्ये तुम्हाला सुंदर, शांत रिसॉर्ट्स मिळतील, जिथे नववर्षाच्या निमित्ताने खास पार्टी आणि डिनरचे आयोजन केले जाते. पार्टनरसोबत शांत वातावरणात 'समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत' २०२५चा निरोप घेणे हा एक वेगळा अनुभव असेल.

भंडारदरा : जर तुमच्या पार्टनरला निसर्ग आणि साहसी गोष्टींची आवड असेल, तर भंडारदरा हे सर्वोत्तम ठिकाण आहे. इथले आर्थर लेक, विल्सन डॅम आणि सुंदर डोंगररांगा खऱ्या अर्थाने मन शांत करतात. ३१ डिसेंबरच्या रात्री तलावाशेजारी कॅम्पिंग करणे किंवा कळसूबाई शिखराच्या जवळचे ट्रेकिंग करणे, हा अनुभव तुमच्या नात्यातील रोमांच वाढवेल. रात्री आकाशातील तारे पाहताना नववर्षाचे स्वागत करण्याचा अनुभव खूपच रोमँटिक असतो.

अलिबाग : 'मिनी-गोवा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अलिबागला जाण्यासाठी तुम्हाला जास्त प्रवासाची गरज नाही. मुंबईपासून समुद्राच्या मार्गाने किंवा रस्त्याने तुम्ही कमी वेळेत येथे पोहोचू शकता. नववर्षाच्या निमित्ताने येथील शांत समुद्र किनारे, जुने किल्ले आणि नारळी-पोफळीच्या बागांमध्ये पार्टनरसोबत फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरू शकतो. येथील कॉटेज आणि व्हिलामध्ये राहून तुम्ही शांतपणे 'न्यू इअर'चे स्वागत करू शकता.