Travel : इथे दुकानात दुकानदारच नसतो, भारताच्या 'या' गावात आजही टिकून आहे इमानदारी; सुट्ट्यांमध्ये नक्की द्या भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:57 IST2026-03-31T13:49:20+5:302026-03-31T13:57:26+5:30

आजच्या युगात जिथे पावलोपावली फसवणूक आणि चोरीच्या घटना घडतात, तिथे भारताच्या एका कोपऱ्यात असंही एक गाव आहे, जिथे आजही माणुसकी आणि इमानदारी जिवंत आहे.

आजच्या युगात जिथे पावलोपावली फसवणूक आणि चोरीच्या घटना घडतात, तिथे भारताच्या एका कोपऱ्यात असंही एक गाव आहे, जिथे आजही माणुसकी आणि इमानदारी जिवंत आहे. नगालँडमधील 'खोनोमा' हे गाव आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यामुळे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या गावात दुकानांमध्ये दुकानदार नसतात आणि दुकानांना कुलूपंही नसतात, तरीही इथे कधीही चोरी होत नाही.

खोनोमा गावातील दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तू मांडून ठेवलेल्या असतात. तिथे कोणताही रखवालदार किंवा दुकानदार नसतो. ग्राहक दुकानात जातात, आपल्याला हवं ते सामान घेतात आणि त्या सामानाची जी काही किंमत असेल, ती प्रामाणिकपणे तिथे ठेवलेल्या डब्यात किंवा काउंटरवर ठेवून निघून जातात.

ही कोणतीही अंधश्रद्धा किंवा परंपरा नाही, तर गेल्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेला एकमेकांवरील अढळ विश्वास आहे. "दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणं किंवा खोटं बोलणं पाप आहे," हीच शिकवण इथल्या लहान मुलांच्या मनावरही बिंबवली जाते.

खोनोमा गाव केवळ प्रामाणिकपणासाठीच नाही, तर निसर्गाच्या संवर्धनासाठीही ओळखलं जातं. हे गाव भारताचं पहिलं 'ग्रीन विलेज' आहे. इथले लोक स्वच्छतेला आणि पर्यावरणाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानतात. जंगलं आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण गाव एकजुटीनं काम करतं. त्यामुळेच देश-विदेशातील पर्यटकांना हे शांत आणि हिरवेगार ठिकाण भुरळ घालते.

जर तुम्हाला या उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीतरी वेगळं आणि शांत पाहायचं असेल, तर खोनोमा हा उत्तम पर्याय आहे. खोनोमापासून सर्वात जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन दिमापूर येथे आहे.

दिमापूरवरून तुम्ही टॅक्सी किंवा बसने नगालँडची राजधानी कोहिमाला पोहोचू शकता. कोहिमापासून खोनोमा गाव अवघ्या २० किलोमीटर अंतरावर आहे.

ईशान्य भारताचं सौंदर्य आणि तिथली संस्कृती जवळून अनुभवायची असेल, तर खोनोमा गावाला एकदा नक्की भेट द्यायला हवी.