शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 21:54 IST

1 / 6
मंगळ ग्रहावर जाण्याचे स्वप्न जगभरातील शास्त्रज्ञ पाहत आहेत. मात्र, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या ओडिशामध्ये एक अशी जागा आहे, जिथे गेल्यावर तुम्हाला आपण पृथ्वीवर आहोत की 'मंगळ' ग्रहावर, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर आणि पर्यटकांमध्ये या अजब ठिकाणाची प्रचंड चर्चा सुरू असून, केवळ एक फोटो काढण्यासाठी पर्यटक येथे लांबून येत आहेत.
2 / 6
ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील 'दमनजोडी' येथे एक असा परिसर आहे ज्याला 'रेड मड पाँड' म्हणून ओळखले जाते. चहुबाजूला पसरलेली गडद लाल माती, पाण्याचा थर आणि तिथल्या जमिनीची विशिष्ट रचना हुबेहूब मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागासारखी दिसते. इथला परिसर इतका विलोभनीय आहे की, एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटातील दृश्य असावे असा भास होतो.
3 / 6
आजच्या सोशल मीडियाच्या युगात हे ठिकाण इन्स्टाग्रामर्स आणि ट्रॅव्हल फोटोग्राफर्ससाठी हॉटस्पॉट बनले आहे. इथले फोटो पाहिल्यानंतर कोणालाही वाटेल की तुम्ही अंतराळात प्रवास करून आला आहात. त्यामुळेच ऑफ-बीट डेस्टिनेशन शोधणाऱ्या पर्यटकांच्या यादीत हे ठिकाण आता पहिल्या क्रमांकावर आले आहे.
4 / 6
हे ठिकाण पाहताना जितके डोळ्यांचे पारणे फेडते, तितकेच ते घातकही ठरू शकते. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, हा निसर्गाचा चमत्कार नसून एका औद्योगिक प्रक्रियेचा भाग आहे. ही जागा प्रत्यक्षात एल्युमिना रिफायनरीचा औद्योगिक कचरा साठवण्याचे क्षेत्र आहे. यात आयर्न ऑक्साइडचे प्रमाण प्रचंड असल्याने मातीचा रंग रक्तासारखा लाल झाला आहे.यातील पाण्याचा पीएच (pH) १०.५ ते १३.५ च्या दरम्यान असतो, जो अत्यंत जहरी आणि घातक आहे. त्यामुळे येथे फिरताना किंवा फोटो काढताना पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखणे आणि उंचावर राहणे आवश्यक आहे.
5 / 6
तुम्ही जर या 'मंगळ' सदृश जागेला भेट देण्यासाठी जात असाल, तर ओडिशात इतरही दोन आश्चर्यकारक ठिकाणे आहेत. त्यातील पहिले कान्हा कुंड (बाली संकरा): याला ओडिशाचे 'ग्रँड कॅनयन' म्हटले जाते. इथले खडकांचे नैसर्गिक आकार पाहून तुम्ही थक्क व्हाल. तर, दुसरे आहे तप्तपाणी (गंजाम): येथे निसर्गाचा चमत्कार असलेला गरम पाण्याचा झरा आहे, जिथे स्नान केल्याने त्वचेचे रोग बरे होतात, अशी मान्यता आहे.
6 / 6
मंगळ ग्रहाचा थरार अनुभवायचा असेल तर ओडिशातील दमनजोडीचे हे अनोखे 'रेड मड पाँड' एकदा लांबून पाहण्यासारखे नक्कीच आहे!
टॅग्स :tourismपर्यटनOdishaओदिशा