Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:17 IST2025-12-25T13:10:28+5:302025-12-25T13:17:22+5:30
आजच्या धावपळीच्या युगात आपण सर्वजण घड्याळाच्या काट्यावर चालतो.जगात एक असंही ठिकाण आहे जिथे घड्याळाला काहीच महत्त्व नाही.

आजच्या धावपळीच्या युगात आपण सर्वजण घड्याळाच्या काट्यावर चालतो. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट वेळेनुसार ठरलेली असते. पण, जगात एक असंही ठिकाण आहे जिथे घड्याळाला काहीच महत्त्व नाही. नॉर्वेमधील 'सोमरॉय' हे छोटं बेट सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. 'टाईम फ्री झोन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बेटावर लोक घड्याळ बघत नाहीत, तर जेव्हा मन करेल तेव्हा आपली कामं करतात.

आर्क्टिक सर्कलच्या जवळ असलेल्या या बेटावर निसर्गाचा एक अजब चमत्कार पाहायला मिळतो. १८ मे ते २६ जुलै या ६९ दिवसांच्या काळात इथे सूर्य कधीच मावळत नाही. म्हणजे सलग दोन महिने इथे फक्त दिवसच असतो. रात्र आणि दिवस यातला फरकच संपल्यामुळे इथल्या लोकांनी वेळेच्या बंधनातून स्वतःला मुक्त करून घेतलं आहे.

सोमरॉय बेटाला मुख्य भूभागाशी जोडणाऱ्या पुलावर एक अनोखे दृश्य पाहायला मिळते. पर्यटक जेव्हा या बेटावर येतात, तेव्हा ते आपली घड्याळं काढून पुलाच्या रेलिंगला बांधतात. वेळेच्या पाबंदीतून मुक्त होण्याचं हे एक प्रतीक मानलं जातं. या बेटावर गेल्यावर तुम्ही वेळेचे गुलाम नसता, तर स्वतःचे मालक असता.

इथली जीवनशैली अतिशय वेगळी आहे. सोमरॉयमध्ये राहणारे सुमारे ३५० नागरिक घड्याळानुसार न चालता आपल्या शरीराच्या गरजेनुसार चालतात. जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवणं आणि जेव्हा थकवा जाणवेल तेव्हा झोपणं, हाच इथला नियम आहे.

त्यामुळे तिथे मध्यरात्री २ किंवा ३ वाजता मुलं समुद्रात पोहताना दिसतात, कोणी फुटबॉल खेळत असतं, तर कोणी आपल्या घराला रंगकाम करताना दिसतं. इथे 'रात्र' असा काही प्रकारच उरत नाही.

उन्हाळ्यात जसा सलग दिवस असतो, तसंच हिवाळ्यात अगदी उलट चित्र असतं. नोव्हेंबर ते जानेवारी या ७० दिवसांच्या काळात इथे सूर्य उगवतच नाही. संपूर्ण बेट काळोखात बुडालेलं असतं. अशा वेळी इथले लोक कृत्रिम प्रकाशाच्या आधारावर आपलं जीवन जगतात.

जगातील पहिलं 'टाईम फ्री झोन' २०१९ मध्ये इथल्या स्थानिक नागरिकांनी नॉर्वे सरकारकडे मागणी केली होती की, सोमरॉयला अधिकृतपणे जगातील पहिलं 'टाईम फ्री झोन' घोषित करावं. जरी हा नंतर पर्यटनाचा एक भाग म्हणून समोर आला असला, तरी इथली मुक्त जीवनशैली आजही पर्यटकांना भुरळ घालते.

















