Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:47 IST2026-01-12T17:40:13+5:302026-01-12T17:47:17+5:30

यंदा २६ जानेवारीला सोमवार आल्यामुळे पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी वर्षातील पहिला लॉन्ग वीकेंड चालून आला आहे.

यंदा २६ जानेवारीला सोमवार आल्यामुळे पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी वर्षातील पहिला लॉन्ग वीकेंड चालून आला आहे. जर तुम्ही या सुट्टीत कुठे फिरायला जायचा विचार करत असाल, तर ३ ते ४ दिवसांच्या या सुट्टीत वृंदावनची सहल तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांनी पावन झालेली ही नगरी केवळ धार्मिक स्थळ नसून पर्यटनाचा एक मोठा केंद्रबिंदू बनली आहे.

वृंदावनचे सर्वात महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित मंदिर म्हणजे बांके बिहारी मंदिर. राजस्थानी शैलीतील हे मंदिर स्वामी हरिदासजींनी स्थापन केले आहे. इथली विशेष बाब म्हणजे इथे आरती होत नाही, तर केवळ दर्शन आणि सेवा होते. कान्हाच्या दर्शनावेळी मध्ये-मध्ये पडदा लावला जातो, जेणेकरून ठाकूरजींना त्रास होऊ नये.

यासोबतच इटालियन पांढऱ्या संगमरवरात बनलेले 'प्रेम मंदिर' हे मंदिर रात्रीच्या वेळी रोषणाईने उजळून निघते. इथला 'लाईट अँड साऊंड शो' पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. जवळचेच इस्कॉन मंदिर हे पाश्चात्य पर्यटकांचे आवडते ठिकाण असून इथे सतत 'हरे कृष्ण' मंत्राचा जप चालतो. इथली वास्तुकला आणि शांती मनाला प्रसन्न करते.

असे मानले जाते की, इथल्या रहस्यमयी निधिवनात आजही रात्री इथे श्रीकृष्ण आणि राधा गोपिकांसह रासलीला करतात. रात्रीच्या वेळी इथे कोणालाही थांबण्याची परवानगी नसते. वृंदावनजवळील केशी घाट हे यमुनेची आरती आणि सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

वृंदावनची भेट तिथल्या स्ट्रीट फूडशिवाय अपूर्ण आहे. इथली घट्ट मलाईदार लस्सी जगप्रसिद्ध आहे. ४० ते ६० रुपयांत मिळणारा एक ग्लास लस्सी तुमचे पोट भरण्यासाठी पुरेशी आहे. नाश्त्यासाठी इथली बटाट्याची भाजी आणि पुरी नक्की ट्राय करा. सोबतच समोसे आणि कचोरीचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

जर तुम्हाला कांदा-लसणाशिवाय शुद्ध सात्विक जेवण हवे असेल, तर जयपुरिया भवन सर्वोत्तम आहे. १८० रुपयांत इथे 'अनलिमिटेड' थाली मिळते, ज्यात मिस्सी रोटी, कढी, डाळ आणि अनेक पदार्थांचा समावेश असतो.

वृंदावनमध्ये राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट कमी असेल, तर ५०० रुपयांपासून मंदिर परिसरात अनेक चांगल्या धर्मशाळा उपलब्ध आहेत. जर तुम्हाला आरामदायी ट्रिप हवी असेल, तर अनेक लक्झरी हॉटेल्सही इथे मोठ्या प्रमाणात आहेत.

या २६ जानेवारीला सोमवारची सुट्टी जोडून तुम्ही शुक्रवार रात्री किंवा शनिवार सकाळी वृंदावनसाठी प्रस्थान करू शकता. आध्यात्मिक शांती आणि चविष्ट जेवणाचा आनंद घेण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली जागा नाही.