एक ट्रीप, २ देश...कमी खर्चात कसं करायचा 'डबल प्रवास'?; जाणून घ्या बजेटमधला परफेक्ट फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:13 IST2025-11-24T12:06:47+5:302025-11-24T12:13:52+5:30

फिरायची हौस प्रत्येकाला असते, परंतु जेव्हा एका ट्रिपमध्ये २ देशांचा दौरा करण्याचा विचार येतो, तेव्हा सर्वांची नजर बँकेतील बॅलन्सवर असते. तुम्ही खर्चिक बाब म्हणून केवळ एक देश फिरण्यावर समाधान मानलंय का, जर असेल तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. आता आंतरराष्ट्रीय ट्रीप करताना असे काही कमाल फॉर्म्युले आहेत, ज्यामुळे तुम्हाला एकाच बजेटमध्ये एकाच सुट्टीत २ देशांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येऊ शकतो.

२ देश अथवा त्याहून अधिक देशांमध्ये फिरणे सहज सोपे आहे. हे केवळ तुम्हाला अधिक अनुभव देणारे नसेल तर तुम्ही योग्य नियोजन केले तर तुमच्या खिशावर अधिकचा भारही पडणार नाही. अनेक देशांमध्ये एकाच दौऱ्यातून फिरण्यासाठी तुम्हाला काही खास ट्रॅव्हल ट्रीप्सवर लक्ष द्यावे लागेल.

विमान आणि ट्रेनचा योग्य ताळमेळ - एकाच दौऱ्यात अनेक शहरे, देश फिरण्यासाठी स्मार्ट ट्रिक आहे. विमान आणि रेल्वेचे कॉम्बिनेशन..तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या देशातून कुठल्या तरी एका शहरात विमानातून उतरू शकता. परंतु दुसऱ्या देशात जाण्यासाठी ट्रेन अथवा बस या वाहतुकीचा वापर करू शकता. त्यामुळे तुमचे पैसे आणि वेळ दोन्हीही वाचतील.

विशेषत: युरोपीय देशात फिरताना तुम्हाला ही ट्रिक फायदेशीर ठरते. उदा. तुम्ही लंडनमध्ये ऐतिहासिक स्थळ फिरल्यानंतर तिथून अवघ्या ३ तासांत रेल्वे प्रवास करून पॅरिसला पोहचू शकता. जर तुम्ही युरोप फिरायचा प्लॅन करत असाल तर शेंगेन क्षेत्राचा फायदा नक्कीच घ्या.

शेंगेनचा व्हिसा असणारे प्रवासी एकूण २७ देशात कुठल्याही वेगवेगळ्या इमिग्रेशनशिवाय आरामात फिरू शकतात. त्याचा फायदा असा की, याठिकाणी देश बदलण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. तुम्ही बस अथवा ट्रेन यासारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकता.

उदा.ऑस्ट्रियातील सुंदर शहर साल्जबर्गहून जर्मनीच्या म्यूनिखपर्यंत बसने जाण्यासाठी ३ तासाहून कमी कालावधी लागतो. त्यामुळे तुम्ही एकाच दिवसात २ देशातील २ मोठी शहरे आरामात अनुभवू शकता. ज्यातून तुमचा प्रवासाचा वेळ आणि पैसे दोन्ही बचत होतील. युरोपातील भौगोलिक स्थिती दौरा करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. याठिकाणी प्रसिद्ध नद्या आहेत, ज्या २ देशांना नैसर्गिक सीमांनी विभागतात.

यामुळे नद्या क्रुजच्या माध्यमातून एका देशातून दुसऱ्या देशात पोहचणे सोपे आणि आरामदायक बनते. या क्रूज प्रवासासाठी कालावधीही कमी लागतो. प्रवास अतिशय मनमोहक बनतो. उदा. डेन्यूब नदीवरील कॅटामारन ऑस्ट्रियाची राजधानी वियना आणि स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा केवळ ७५ मिनिटांत एकमेकांना जोडतात.

जर तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय कार चालवण्याचा परवाना असेल तर युरोपात स्वत: कार चालवणे मजेशीर अनुभव आहे. यूरोपियन यूनियन देशांमधील सीमा पार करणे सोपे आहे. रस्ते सुरक्षित आहेत. स्लोवेनियाहून इटलीपर्यंत अंतर केवळ ९० मिनिटांचे आहे. त्यामुळे रोड ट्रिपचा खर्चही जास्त येत नाही. अनेक कुटुंबे, जोडपे याचा फायदा घेतात, रस्ते प्रवासाचा अनुभव घेत ते कुठेही थांबू शकतात.

कॅरेबियन क्षेत्रातील बेटांचे समुह एकमेकांपासून खूप जवळ आहे. इथं एका देशातील दुसऱ्या देशात जायला तितकाच वेळ लागतो, जितका तुम्ही भारतात एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात . टोर्टोलाहून चार्लोट अमालीपर्यंत फेरी बोट ४५ मिनिटांत तुम्हाला पोहचवते. प्रवासावेळी तुम्ही सागरी प्रवासाचा आनंद घेऊ शकता, जो तुमचा दौरा आणखी आनंदी करेल.

















