Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 02:06 IST2026-04-12T01:58:28+5:302026-04-12T02:06:06+5:30

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये एक तरुणीचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत मिळाल्याने खळबळ उडाली. अंबरनाथमधील एस-३ पार्क या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे.

अंबरनाथमधील एस-३ पार्क या नामांकित हॉटेलच्या खोलीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली. हॉटेल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका खोलीत तरुणीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता.

शनिवारी (११ एप्रिल) रात्री ही घटना उघडकीस आली. सिमरन पाटील असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले, तरी इतक्या लवकर आत्महत्या केली असे म्हणणे घाईचे होईल असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरन पाटील ही तरुणी अंबरनाथमधील ग्लोब बिझनेस पार्कमध्ये असलेल्या एका खासगी कंपनीमध्ये अकाऊंटंट होती. सिमरनचे बॉससोबत मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते.

घटना घडली त्या दिवशी सिमरनने तिच्या बॉसला शेवटचं भेटायला बोलावलं होतं. बॉस तिला अंबरनाथमधील एस-३ पार्क हॉटेलमध्ये घेऊन आला. तिथे काही वेळ थांबल्यानंतर थोड्या वेळात परत येतो असे सांगून बॉस गेला. त्यानंतर सिमरने बॉसला अनेक वेळा कॉल केले, पण त्याने ते घेतले नाही. त्यानंतर सिमरनने नैराश्यातून गळफास आत्महत्या केली असावी, अशी शंका आहे.

बॉस जेव्हा परत हॉटेलमध्ये आला. तेव्हा त्याने दरवाजा वाजवला. कोणताही प्रतिसाद न आल्याने हॉटेल कर्मचाऱ्याच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा सिमरन पाटीलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली.

सिमरनने आत्महत्या केली की, तिची हत्या केली गेली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे ज्या खोलीत सिमरनचा मृतदेह आढळून आला, ती अंबरनाथमधील एका स्थानिक नेत्याच्या नावाने बुक केलेली होती. त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे. पोलीस आता कॉल डिटेल्स आणि इतर संबंधित सर्व अंगांनी या प्रकरणाचा तपास करत आहेत.