स्कॅमरची तुमच्यावर नजर! WhatsApp फ्रॉडची नवी पद्धत; कॉल फॉरवर्ड करुन 'असे' मागतात पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:50 IST2025-03-17T11:42:54+5:302025-03-17T11:50:23+5:30
WhatsApp फसवणुकीचा आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे.

आजकाल WhatsApp फसवणुकीचा आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. ही फसवणूक एका अनोख्या पद्धतीने केली जात आहे. भोपाळमधील एका महिलेचे WhatsApp हॅक झालं. महिलेच्या मोबाईल नंबरवरून तिच्या पतीला फोन आला होता की तिला तातडीने पैशांची गरज आहे.
जेव्हा पतीला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं तेव्हा त्याने क्राइम ब्रांचकडे तक्रार दाखल केली. दुसरीकडे महिलेचं WhatsApp बंद झालं. तिला कोणतेही कॉल किंवा मेसेज येत नव्हते.
जेव्हा पतीने सायबर क्राइम ब्रांचशी संपर्क साधला तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की कॉल फॉरवर्डिंग एक्टिव्हेट करून पत्नीचं WhatsApp अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. महिला म्हणाली की, एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता.
ज्यामध्ये कॉलरने डिलिव्हरी बॉय असल्याचा दावा केला होता आणि तिला एका नंबरवर कॉल करण्यास सांगितलं होतं. व्यस्त असल्याने, तिने जास्त विचार न करता त्या नंबरवर कॉल केला. हा नंबर *# ने सुरू होत होता, ज्यामुळे कॉल फॉरवर्डिंग एक्टिव्हेट झालं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॅमरने महिलेच्या मोबाईल नंबरचा वापर करून WhatsApp रजिस्ट्रेशन केलं आणि व्हेरिफिकेशनसाठी कॉल फॉरवर्डिंगचा वापर केला. अशाप्रकारे एका अनोळखी फोनवर महिलेचं WhatsApp एक्टिव्ह झालं. यानंतर स्कॅमर्सनी WhatsApp आणि इतर UPI पद्धतींद्वारे पैसे मागण्यास सुरुवात केली.
अलिकडच्या काळात अशी अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत. अशा परिस्थितीत जर कोणी तुम्हाला *# ने सुरू होणाऱ्या मोबाईल नंबरवर कॉल करण्यास सांगितलं तर तसं अजिबात करू नका. यामुळे स्कॅमरना तुमच्या WhatsApp थेट प्रवेश मिळतो. त्याचप्रमाणे स्कॅमर दुसऱ्या मार्गाने WhatsApp रजिस्ट्रेशन करतात.
ही पद्धत APK मेसेंजर फॉरवर्डर आहे. फिशिंग लिंकवर क्लिक करण्याचं आमिष दाखवलं जातं. यानंतर एक थर्ड पार्टी एप इन्स्टॉल केलं जातं. हे नंतर स्कॅमरच्या नंबरवर फॉरवर्ड केलं जातं.
जर तुमचे WhatsApp हॅक झालं तर ते एक्सेस करण्यासाठी थेट सायबर क्राइम ब्रँचला कळवा. तुम्ही support@support.whatsapp.com वर ईमेल करू शकता. तसेच अशी फसवणूक टाळण्यासाठी टू-फॅक्टचर ऑथेंटिकेशन चालू केलं पाहिजे.
WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. ते आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं.