जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:50 IST2025-11-24T19:46:09+5:302025-11-24T19:50:29+5:30

अनेकजण फोनचा बाहेरील लुक पाहून तो विकत घेतात, पण नंतर लक्षात येते की डिव्हाइसमध्ये दोष आहे किंवा फोन चोरीचा निघाला आहे.

आजकाल सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करणे खूप सामान्य झाले आहे. कमी बजेट असो, नवीन मॉडेलची इच्छा असो किंवा फक्त बॅकअपसाठी फोन हवा असो, जुन्या स्मार्टफोनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, जर थोडीशीही खबरदारी घेतली नाही, तर सेकंड हँड फोन खरेदी करणे मोठ्या नुकसानीचा सौदा ठरू शकते.

अनेकजण फोनचा बाहेरील लुक पाहून तो विकत घेतात, पण नंतर लक्षात येते की डिव्हाइसमध्ये छुपा दोष आहे किंवा फोन चोरीचा निघाला आहे. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे अत्यंत आवश्यक आहे. सेकंड हँड फोन खरेदी करताना 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा.

सर्वप्रथम फोन हातात घेऊन त्याची बॉडी आणि स्क्रीन काळजीपूर्वक तपासा. जर फ्रेम वाकलेली असेल, स्क्रीन वर आलेली असेल किंवा बॅक कव्हर फुगलेले वाटत असेल, तर हे बॅटरी फुगल्याचे संकेत असू शकतात. स्क्रीनवरील खोल स्क्रॅच, डाग किंवा लाईन्सकडे दुर्लक्ष करू नका, कारण भविष्यात यासाठी मोठा खर्च करावा लागू शकतो.

अनेकदा स्वस्त दरात चोरीचे फोन विकले जातात. यासाठी फोनचा IMEI नंबर तपासणे आवश्यक आहे. यासाठी फोनमध्ये *#06# डायल करा आणि दिसणारा IMEI नंबर गुगलवर किंवा सरकारच्या अधिकृत पोर्टलवर तपासा. जर IMEI नंबर ब्लॅकलिस्टेड असेल किंवा ट्रॅकिंगमध्ये समस्या दिसत असेल, तर त्या फोनपासून त्वरित दूर राहा.

जुन्या फोनमध्ये बॅटरी लवकर खराब होणे ही सर्वात सामान्य समस्या आहे. जर, तुम्ही आयफोन घेत असाल, तर बॅटरी हेल्थ सेटिंग्जमध्ये जाऊन स्टेटस नक्की पाहा. अँड्रॉइड फोनमध्ये बॅटरी बॅकअप आणि चार्जिंग स्पीडचा अंदाज घ्या. चार्जिंग पोर्ट जर ढिला असेल किंवा केबल वारंवार डिस्कनेक्ट होत असेल, तर भविष्यात मोठी अडचण येऊ शकते.

जुना फोन खरेदी करताना नुसता कॅमेरा आणि कॉलिंग नाही, तर ॲप उघडण्याचा स्पीड आणि स्टोरेज तपासा. जर फोन वारंवार हँग होत असेल किंवा कंपनीने त्या मॉडेलचे सिस्टम अपडेट देणे बंद केले असेल, तर तो डिव्हाइस जास्त दिवस तुमच्या उपयोगी पडणार नाही.

जुना फोन विकत घेणे हा योग्य निर्णय असू शकतो, पण तुम्ही योग्य काळजी घेतली पाहिजे. छोट्याशा चुकीमुळे तुमचे हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, फोनची चांगली तपासणी करा, IMEI वेरिफाय करा आणि बॅटरी व सॉफ्टवेअर या दोन्ही गोष्टींची स्थिती नक्की तपासा.