"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:51 IST2025-11-20T15:37:01+5:302025-11-20T15:51:46+5:30
Elon Musk Statement on Artificial Intelligence: टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत माणसाने एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. जगाचे भविष्य एआय ठरवणार आहे. त्या जगात पैशाचे महत्त्व संपलेलं असेल, नोकरी करणे हा व्यक्तिगत पर्याय बनेल आणि गरिबीचे अस्तित्वच संपेल, असे एलन मस्क यांनी म्हटले आहे.

एनवीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग यांच्यासोबत एलन मस्क अमेरिका-सौदी गुंतवणूक परिषदेत बोलत होते. मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यांच्यामुळे जग कशा पद्धतीने बदलेलं असेल, याचा परिचय करून दिला.

एलन मस्क म्हणाले की, "एआय आणि ह्युमनॉइड रोबोट प्रत्यक्षात गरीबी संपवून टाकतील. रोबोट प्रत्येकालाच श्रीमंत बनवेल."

"चलनाचे महत्त्व कमी होऊन जाईल. वीज आणि दुर्मिळ खनिजांची उणीव त्या काळातही असेल, पण पैशांचे महत्त्वच संपून जाईल", असे भाकित एलन मस्क यांनी केले आहे.

विज्ञानाधारित साहित्य लिहिणारे लेखक इयान एम. बॅक्स यांच्या कल्चर सीरिजचा उल्लेख केला. यामध्ये भविष्यातील समाजाचे चित्र मांडण्यात आले आहे. ज्यात एआय आणि रोबोटच सगळी काम करतात. माणसाने काम करायचे की नाही, हे त्याच्यावर अवलंबून असेल. मस्क म्हणाले यातून दिसते की, एआयमुळे संभाव्य भविष्य कसे असेल.

घराच्या पाठीमागील जागेत भाजीपाला उगवणे कठीण आहे, पण काही लोक ते करतात. कारण त्यांना असे करणे आवडते. भविष्यात काम करणेही असेच होऊन जाईल. पर्यायी असेल.

एलन मस्क यांनी त्यांची एक एआय कंपनी तयार केली आहे. कंपनीचे नाव xAI आहे आणि तिचा चॅटबॉटही आहे, ज्याचे नाव ग्रोक आहे. टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे प्रमुख असलेल्या मस्क यांनी मोठी भविष्यवाणी वर्तवली आहे.

















