मतदार ओळखपत्र आधारशी लिंक नाही, त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 08:58 PM2022-12-16T20:58:28+5:302022-12-16T21:06:34+5:30

आपल्याकडे आधारकार्ड आता सर्वात महत्वाचे कागदपत्र झाले आहे. सध्या आधारकार्ड मतदान कार्डला लिंक करण्यासंदर्भात एक मेसेज व्हायरल झाला आहे.

आपल्याकडे आधारकार्ड आता सर्वात महत्वाचे कागदपत्र झाले आहे. सध्या आधारकार्ड मतदान कार्डला लिंक करण्यासंदर्भात एक मेसेज व्हायरल झाला आहे.

ज्यांची ओळखपत्रे आधार क्रमांकाशी जोडलेली नाहीत त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जातील का? संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विचारलेल्या या प्रश्नावर सरकारच्या उत्तराने कोट्यवधी जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

तुम्ही तुमचा मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करणे आवश्यक नाही, असे सरकारने म्हटले आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी लेखी स्वरूपात ही माहिती दिली. 'निवडणूक कायदा (सुधारणा) कायदा, 2021 मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की मतदार आपला आधार क्रमांक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना द्यायचा की नाही, हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे, असं कायदा मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.

ज्यांचे आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी लिंक केलेले नाहीत, त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जातील का, असा प्रश्न केंद्रीय मंत्र्यांना संसदेत विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, नाही, ते लिंक पूर्ण करतात की नाही हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे.

शुक्रवारीच भारतीय जनता पक्षाचे खासदार विनोद कुमार सोनकर यांनी लोकसभेत एक देश, एक मतदार यादीची मागणी केली आणि राष्ट्र आणि लोकशाहीच्या हितासाठी 'एक देश, एक मतदार यादी'ची व्यवस्था करायला हवी, असे सांगितले. खासदार विनोदकुमार सोनकर यांनी अधिवेशनात नियम ३७७ अन्वये ही मागणी मांडली.

“वेगवेगळ्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यावर सरकारचा खर्च वाढतो. लोकांमध्येही संभ्रम निर्माण होतो. मतदारांमध्ये अविश्वास निर्माण होतो, त्यामुळे लोकशाही कमकुवत होते.

खासदार सोनकर यांनी केंद्र सरकारला विनंती केली आणि म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ बद्दल सांगितले आहे. त्याचप्रमाणे ‘देश एक, मतदार यादी’ही असावी. ते देशाच्या आणि लोकशाहीच्या हिताचे असेल, असंही ते म्हणाले.