रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:39 IST2025-08-21T14:53:47+5:302025-08-21T15:39:45+5:30
Nadeen Ayoub Photos : जगभरात वेगवेगळी युद्ध सुरु असताना 'ही' तरूणी चर्चेत आली आहे... त्यामागचं कारण काय?

Nadeen Ayoub Photos :
इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातला संघर्ष सध्या टोकाला पोचलेला आहे. मृत्यूचे तांडव सुरु आहे. याचदरम्यान, नादीन अय्यूब ही पॅलेस्टाइनची तरुणी यंदा मिस युनिव्हर्स या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
एका पॅलेस्टिनी तरुणीने या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा व्यासपीठावर पहिल्यांदाच पॅलेस्टाइनचे प्रतिनिधित्व करायला मिळणार याचा मला अभिमान आहे, अशी भावना नादीनने व्यक्त केली आहे.
नादीनने २०२२ मध्ये मिस पॅलेस्टाइनचा किताब जिंकला. वयाच्या २७ व्या वर्षी तिने मिस अर्थ स्पर्धेत सहभाग घेतला आणि पाच फायनलिस्ट्समध्येही तिचा समावेश झाला. त्यानंतर ती मिस युनिव्हर्स स्पर्धेत उतरणार हे निश्चित होते.
पण गाझामध्ये सुरू असलेल्या नरसंहाराच्या पार्श्वभूमीवर ते शक्य झाले नाही. तिने साहित्य आणि मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे. वेलनेस आणि न्यूट्रिशन कोच म्हणूनही तिने व्यावसायिक शिक्षण घेतलं आहे.
शिक्षिका आई आणि वकील वडिलांच्या निमित्ताने तिने अमेरिका आणि कॅनडामध्ये वास्तव्य केलं आहे. सध्या रामल्ला, अम्मान आणि दुबई अशा तीन ठिकाणी तिचं वास्तव्य असतं.
ऑलिव्ह ग्रीन अकादमीच्या माध्यमातून ती शाश्वत विकासाबाबत जनजागृतीचं काम करते. मिस युनिव्हर्स स्पर्धा थायलंडमधल्या पार्क क्रेट शहरात नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
"गाझा पट्टीत, त्यातही पॅलेस्टाइनमध्ये सध्या काय सुरू आहे हे संपूर्ण जग पाहत आहे. अशा परिस्थितीत मिस युनिव्हर्सच्या व्यासपीठावर स्पर्धक म्हणून सहभागी होत असताना मी एका सत्याचा आवाज म्हणूनही हे प्रतिनिधित्व करत आहे."
"ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, त्या माझ्या मायभूमीतल्या नागरिकांची मी प्रतिनिधी आहे. आम्ही आशा, चिकाटी आणि आमच्या मायभूमीवरच्या आमच्या प्रेमाचं प्रतीक घेऊन जगत आहोत’, असे नादीन आपल्या मनोगतात म्हणाली.
"तुमच्याकडे पॉवर असते तेव्हा तुम्ही अन्यायाविरोधात आवाज उठवणं हे तुमचं कर्तव्य असतं. मिस युनिव्हर्स हे एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. गाझा पट्टीत जे घडतं आहे त्याबद्दल या व्यासपीठावरून बोलणं ही माझी जबाबदारी आहे."
"इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मिस युनिव्हर्सच्या व्यासपीठावरून बोलणं ही एक मोठी गोष्ट आहे. अन्यायाविरोधात कुणीच शांत बसू नये, शक्य त्या ठिकाणी पॅलेस्टाइनला सहभागी करून घेणं आवश्यक आहे." असे ती म्हणाली.