भगवान बाहुबली भक्तिसंध्येने सांगलीकर मंत्रमुग्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 20:41 IST2018-01-31T20:35:13+5:302018-01-31T20:41:56+5:30

सांगली : संथ वाहणारी कृष्णामाई... मावळतीकडे चाललेला सूर्य...एकाग्र होऊन चाललेली भगवान बाहुबली यांची आराधना... अशा चैतन्यमय वातावरणात बुधवारी सायंकाळी भगवान बाहुबली भक्तिसंध्या पार पडली.

प्राकृत, कन्नड, मराठी आणि हिंदी या चार भाषांमधील भक्तिगीते आणि सोबतीला धनश्री आपटे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्यांच्या भरतनाट्यम् नृत्याने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करून विविध महिला मंडळांच्या सदस्यांनी उपस्थिती लावल्याने कृष्णाकाठावर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

श्री क्षेत्र श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळ्याला दि. ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

या पार्श्वभूमीवर सांगली परिसरातील महिला मंडळांनी एकत्र येऊन भगवान बाहुबलींची भक्ती व आराधना करण्यासाठी बुधवारी कृष्णा तिरावर वसंतदादा पाटील स्मारकाशेजारी भक्तिसंध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

टॅग्स :सांगलीSangli