स्वप्नात आपण घाबरतो, पण तरीही ओरडण्याचा आवाज का येत नाही? पाहा जाणून घ्या या मागचं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:41 IST2025-12-29T14:55:29+5:302025-12-29T15:41:24+5:30
Dream Interesting Facts : स्वप्नात कितीही प्रयत्न केला तरी जाग आल्यानंतरच तोंडातून आवाज निघतो. यामागे नेमके कारण काय आहे, हे जाणून घेणे रंजक आहे.

Dream Interesting Facts : झोपेत स्वप्न पडणं फारच कॉमन आहे. झोपेत कधी चांगली स्वप्न पडतात, तर कधी घाबरवणारी स्वप्न. काही स्वप्न तर अशी असतात की आपण जोरात ओरडण्याचा प्रयत्न करतो, पण अनेकदा आवाजच बाहेर येत नाही. कितीही प्रयत्न केला तरी जाग आल्यानंतरच तोंडातून आवाज निघतो. यामागे नेमके कारण काय आहे, हे जाणून घेणे रंजक आहे.

एखादं भयानक स्वप्न पडताना जोरात ओरडावसं वाटतं, पण आवाज न निघण्याचा अनुभव अनेकांना येतो. यामागे आपल्या शरीर आणि मेंदूची एक खास यंत्रणा कार्यरत असते.

जेव्हा आपण गाढ झोपेत असतो आणि जिथे स्वप्नं पडतात, त्या अवस्थेला REM स्लीप म्हणजेच Rapid Eye Movement Sleep असे म्हणतात. या वेळी मेंदू बऱ्यापैकी जागा असतो, पण शरीराला पूर्ण विश्रांती मिळावी म्हणून मेंदू स्नायूंना शिथिल करतो.

ओरडण्यासाठी घसा, तोंड आणि जिभेचे स्नायू हालचाल करणे आवश्यक असते. मात्र REM झोपेत हे स्नायू सैल पडतात किंवा जवळजवळ निष्क्रिय होतात. त्यामुळे स्वप्न कितीही भयानक असलं तरी प्रत्यक्षात आवाज बाहेर येत नाही.

हा पॅरालिसिस कोणताही आजार नाही, तर शरीराची एक सुरक्षा यंत्रणा आहे. जर झोपेत स्नायू सक्रिय राहिले, तर माणूस स्वप्न खरे समजून उठून पळू शकतो किंवा स्वतःला दुखापत करू शकतो. म्हणूनच शरीर आपोआप स्नायूंवर नियंत्रण ठेवते.

बहुतेक भयानक स्वप्ने REM झोपेतच पडतात. मेंदूला धोका जाणवतो, पण शरीर प्रतिसाद देऊ शकत नाही. यामुळे जाग आल्यावर हृदयाची धडधड वाढलेली असते आणि माणूस घाबरलेला वाटतो. काही वेळा झोपेतून जाग आल्यावरही काही सेकंद शरीर हलवता येत नाही किंवा बोलता येत नाही. यालाच स्लीप पॅरालिसिस म्हणतात. हा अनुभव भीतीदायक वाटू शकतो, पण तो काही क्षणांत आपोआप ठीक होतो.

यावर उपाय काय?
नियमित वेळेला झोपणे आणि उठणे, ताणतणाव कमी ठेवणे, पाठीवर झोपणे टाळणे, संध्याकाळी चहा-कॉफीचे सेवन कमी करणे या चांगल्या झोपेच्या सवयी अंगीकारल्यास अशा त्रासात मोठ्या प्रमाणात आराम मिळू शकतो.

















