Soft Breakup : ना हायव्होल्टेज ड्रामा, ना आरोप...पण नातं तुटतं; Gen Z चा 'Soft ब्रेकअप' ट्रेंड आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 15:12 IST2026-02-27T14:05:39+5:302026-02-27T15:12:02+5:30

Soft Breakup : आजच्या काळात 'सॉफ्ट ब्रेकअप'चा (Soft Breakup) ट्रेंड खूप चर्चेत आहे. Gen Z पिढीला हा नवा ट्रेंड बराच आवडत आहे.

आजच्या काळात 'सॉफ्ट ब्रेकअप'चा (Soft Breakup) ट्रेंड खूप चर्चेत आहे. Gen Z पिढीला हा नवा ट्रेंड बराच आवडत आहे. खरं तर या पिढीसाठी नातेसंबंध म्हणजे केवळ एकत्र राहणे नव्हे, तर मानसिक शांतता, स्वतःची स्पेस आणि स्वाभिमान जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

पूर्वीच्या काळी जेव्हा एखादं नातं संपायचं, तेव्हा लोक अनेकदा एकमेकांशी भांडायचे, तासनतास वाद व्हायचे आणि शेवटी एकमेकांना सोशल मीडियावरून ब्लॉक करायचे. पण सध्या एक नवा ट्रेंड व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊया काय आहे 'सॉफ्ट ब्रेकअप'.

या प्रकारच्या ब्रेकअपमध्ये ना मोठे वाद होतात, ना आरोप-प्रत्यारोप, ना कोणताही हायव्होल्टेज ड्रामा आणि ना एकमेकांना सोशल मीडियावर ब्लॉक केलं जातं. यात फक्त हळूहळू संवाद कमी केला जातो, भेटीगाठी टाळल्या जातात.

नातं हळूहळू थंड पडू दिलं जातं. अशा पद्धतीने लोक नात्यातून बाहेर पडतात. काहींना हा ट्रेंड आवडत असला तरी, काहींचं म्हणणं आहे की यामुळे गोंधळ निर्माण होतो आणि हे भावनिकदृष्ट्या खूप थकवणारे असतं.

सॉफ्ट ब्रेकअप म्हणजे नातं अचानक संपवण्याऐवजी त्या रिलेशनशिपमधून हळूहळू बाहेर येणं. याच दरम्यान पार्टनरशी कमी बोलणं, मेसेजला उशिरा उत्तर देणं, भेटण्याचे प्लॅन्स टाळणं यामुळे भावनिक ओढा कमी होऊ लागतो. मग एक दिवस शांतपणे बसून नातं संपवलं जातं.

सॉफ्ट ब्रेकअप दिसायला शांत आणि सोपं वाटत असलं तरी, हा ट्रेंड प्रत्येक नात्यासाठी योग्य नसतो. कधीकधी स्पष्ट शब्दांत ब्रेकअप करणं अत्यंत गरजेचं असतं. या प्रकारच्या ब्रेकअपमुळे समोरच्या व्यक्तीला अधिक दुःख होऊ शकतं.

जर तुम्हालाही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असंच वाटत असेल की नाते हळूहळू थंड पडत चाललं आहे, तर शांत राहण्याऐवजी तुम्ही तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने संवाद साधू शकता.

स्पष्टपणे बोलल्याने समस्या सुटू शकते. जर तुम्हाला पार्टनरपासून लांब जायचे असेल, तर त्यांना त्याबद्दल आधीच स्पष्ट कल्पना द्या. कोणालातरी हळूहळू इग्नोर करणं त्यांच्या भावनांना दुखावणारं ठरू शकतं.