सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 17:43 IST2025-07-10T17:33:25+5:302025-07-10T17:43:28+5:30
मुलांसाठी कोणत्या गोष्टी घातक आहेत ते जाणून घेऊया...

आजच्या काळात लहान मुलांना फोन दिले जातात, ज्यामुळे मुलांना लहानपणापासूनच फोनचं व्यसन लागतं. अशा परिस्थितीत पालक नेहमीच मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाईमबद्दल चिंतेत असतात.
स्क्रीनपेक्षा मुलांसाठी काही गोष्टी जास्त धोकादायक आहेत, ज्या त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. पालकांकडून नकळत होणाऱ्या चुकांचा मुलांवर वाईट परिणाम होतो. मुलांसाठी कोणत्या गोष्टी घातक आहेत ते जाणून घेऊया...
नकारात्मक वातावरण आणि भांडणं
जर घरात नकारात्मक वातावरण असेल आणि सतत भांडणं होत असतील, तर त्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मुलांसाठी घरात चांगले वातावरण असणे खूप महत्वाचे आहे.
जर घरात वारंवार भांडणं, आरडा-ओरडा किंवा नकारात्मक वातावरण असेल तर त्याचा मुलांच्या वाढीवर खोलवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, हळूहळू मुलांना स्वतःच्या घरात सुरक्षित वाटत नाही. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमकुवत होतो आणि ते चिडचिडे होतात.
इमोशनल सपोर्ट
मुलांना फिजिकल सपोर्टसोबतच इमोशनल सपोर्टची देखील अत्यंत आवश्यकता असते, पण पालकांना हे समजत नाही. पालक मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करतात, परंतु ते मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात.
असं केल्याने मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. त्यांना एकटेपणा जाणवू लागतो. अशी मुलं मोठी होताना भावनिकदृष्ट्या कमकुवत होतात आणि त्यांच्या मनातील भावना शेअर करू शकत नाहीत.
इतर मुलांशी तुलना
बहुतेक भारतीय पालकांमध्ये असं दिसून येतं की त्यांच्या मुलांची तुलना दुसऱ्यांच्या मुलांशी, नातेवाईकांशी करायला आवडतं. मुलांची इतरांशी तुलना करणं ही देखील एक अतिशय चुकीची सवय आहे.
प्रत्येक मूल त्याच्या पद्धतीने खास असतं. तुमच्या मुलांची वैशिष्ट्ये आणि कमकुवतपणा समजून घेणं हे तुमचं काम आहे. तुलना करण्याऐवजी त्यांचा विकास कसा होईल याकडे नीट लक्ष द्या.