IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 18:41 IST2025-10-02T18:22:49+5:302025-10-02T18:41:57+5:30
IAS Srishti Dabas : दिवसा काम आणि रात्री अभ्यास करून सृष्टी डबास यांनी घवघवीत यश मिळवलं आहे.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. दिवसा काम आणि रात्री अभ्यास करून सृष्टी डबास यांनी घवघवीत यश मिळवलं आहे.
IAS सृष्टी डबास या मुळच्या दिल्लीच्या आहेत. त्या लहान असतानाच त्यांचे पालक वेगळे झाले. त्यानंतर आईने सृष्टी यांना वाढवण्याची जबाबदारी घेतली आणि मुलीचं उत्तम पालनपोषण करण्यासाठी कठीण परिस्थितीतून मार्ग काढला.
लहानपणापासूनच सृष्टी यांनी आईला अनेक आव्हानांना तोंड देताना पाहिलं होतं. त्यामुळेच आपल्या आईचं आयुष्य बदलण्याचा आणि त्यांचं नाव मोठं करण्याचा दृढनिश्चय केला.
सृष्टी डबास या लहानपणापासूनच एक हूशार विद्यार्थिनी होत्या. इंटरमिजिएट डिग्री पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील इंद्र ट्रस्ट कॉलेजमधून राज्यशास्त्रात बीए केलं.
डिग्री पूर्ण केल्यानंतर सृष्टी यांनी इग्नूमधून राज्यशास्त्रात मास्टर्स डिग्री मिळवली. पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळाल्यानंतरच यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली.
यूपीएससी सीएसईची तयारी करत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) मध्ये नोकरी मिळाली. जबाबदाऱ्या पार पाडताना सृष्टी दिवसा काम करायच्या आणि रात्री अभ्यास करायच्या. लंच ब्रेकमध्येही लायब्ररीमध्ये अभ्यास करायच्या.
आरबीआयमध्ये काम करण्यापूर्वी सृष्टी यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातही काम केलं. अभ्यास आणि नोकरी यांच्यात जुळवून घेण्याचा प्रवास खूपच आव्हानात्मक होता, परंतु त्या खचल्या नाहीत आणि कठोर परिश्रम करत राहिल्या.
सृष्टी यांनी २०२३ मध्ये यूपीएससी सीएसईमध्ये पहिला प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नात कमाल केली. कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि समर्पणामुळे ऑल इंडिया सहावा रँक मिळवला आणि भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (आयएएस) निवड झाली.
सृष्टी डबास यांच्या यशामध्ये त्यांच्या मेहनती इतकंच त्यांच्या आईचं देखील मोठं योगदान आहे. सृष्टी फारस सुंदर दिसतात.
असंख्य अडचणींवर मात करून मोठ्या अधिकारी झालेल्या सृष्टी यांच्यापासून लाखो तरुणांना प्रेरणा मिळत आहे. मेहनत केल्यावर सर्वकाही साध्य होतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे.