कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:09 IST2025-10-16T17:01:51+5:302025-10-16T17:09:40+5:30

पवन कुमार प्रजापत यांनी हे सिद्ध केलं आहे की, कठोर परिश्रम कधीही वाया जात नाही.

राजस्थानमधील एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या पवन कुमार प्रजापत यांची यशोगाथा तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे. पवन यांनी आव्हानांचा सामना करत आज असं स्थान मिळवलं आहे की, लोक त्याच्या संघर्षाला आणि हिंमतीला सलाम करतात.

राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील रहिवासी पवन कुमार प्रजापत यांनी हे सिद्ध केलं आहे की, कठोर परिश्रम कधीही वाया जात नाही. पवन यांनी पाचवीपर्यंत गावातील सरकारी शाळेत शिक्षण घेतलं.

जसजसे मोठे झाले तसतसे त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्याही वाढत गेल्या. शाळेला सुटी असेल तेव्हा ते जे काही काम मिळेल ते करत असत. आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी भाजीपाला विकायला सुरुवात केली. घरोघरी जाऊन भाजी विकायचे.

एक काळ असा होता की शिक्षण घेणं देखील अवघड झालं होतं. तसेच इंग्रजीच्या भीतीमुळे त्यांच्या समस्या आणखी वाढल्या. यामुळेच पवन यांना मध्येच शिक्षण सोडून द्यावं लागलं.

शिक्षण सोडल्यानंतर कुटुंबासाठी पैसे कमवावे लागले. पवन यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, तो २००७-०८ चा काळ होता, जेव्हा ते एका कारखान्यात अन्न सेवक म्हणून काम करायचे. दिवसभर कष्ट करून दररोज ५० रुपये कमवत असे.

नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना एका गावकऱ्याने त्यांना पुन्हा शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. बारावी पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली.

डिग्री मिळवली आणि सरकारी नोकरीची तयारी सुरू केली. याच दरम्यान, २०१२ मध्ये, त्यांनी भारतीय सैन्यात शिपाई पदासाठी अर्ज केला आणि त्यात ते यशस्वी झाले. पण ते तिथेच थांबले नाहीत.

काम करताना आपली तयारी सुरूच ठेवली. तो इंग्रजीत थोडे कच्चे होते, पण गणितात खूप हूशार होते. पुढच्या वर्षी त्यांनाा रेल्वेमध्ये ज्युनियर अकाउंटंटची नोकरी मिळाली.

याच दरम्यान, कोणीतरी त्यांना राजस्थान प्रशासकीय सेवा (RAS) परीक्षेबद्दल सांगितले. २०१८ मध्ये पहिल्यांदाच RAS परीक्षा दिली, परंतु काही कारणास्तव ते नापास झाले. तरीही त्यांनी हार मानली नाही, अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं.

२०२१ मध्ये दुसरी संधी मिळाली, त्यांनी १७० वा रँक मिळवला आणि ते RAS अधिकारी झाले. आज ते जैसलमेर नगर परिषदेत कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतात.

पवन यांचा हा प्रवास सुरूच आहे, कारण ते आता UPSC परीक्षेची तयारी करतो. त्यांची यशोगाथा अशा तरुणांसाठी प्रेरणा आहे जे आपली स्वप्नं साध्य करण्यासाठी संघर्ष करत आहेत.