आई - आजीच्या हातचं कैरीचे पन्हे कसे मस्त लागते, पाहा पारंपरिक चवीसाठी ७ सिक्रेट टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2026 11:05 IST2026-04-05T11:00:10+5:302026-04-05T11:05:02+5:30

how to make kairiche panha more tasty at home : how to make perfect sweet and tangy kairi panha : पन्ह अधिक चविष्ट, चटपटीत आणि रिफ्रेशिंग व्हावं यासाठी खास टिप्स...

बाहेर रणरणतं ऊन आणि अंगाची लाहीलाही होत असताना, मनाला आणि शरीराला तृप्त करणारं एकच पेय डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे थंडगार 'कैरीचं पन्ह'. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याचं विशेष आवडीचं पन्ह म्हणजे अगदी सुखचं...

कैरीचं पन्ह केवळ चवीलाच छान असतं असं नाही, तर ते उन्हाचा तडाखा आणि डिहायड्रेशनपासूनही आपला बचाव करतं. आपल्यापैकी बरेचजण घरच्याघरीच पन्ह तयार करतात परंतु या कैरीच्या पन्ह्याला म्हणावी तशी पारंपरिक चव येत नाही, अशावेळी अगदी हिरमोड होतो... पण नेहमीच घरोघर तयार केलं जाणारं पन्ह जर थोड्या खास टिप्सवापरुन तयार केलं, तर त्याची चव आणखीनच लाजवाब लागू शकते...

पन्ह अधिक चविष्ट, चटपटीत आणि रिफ्रेशिंग व्हावं यासाठी काही खास टिप्स पाहूयात.

कैरी पाण्यात उकडण्यापेक्षा कुकरमध्ये वाफेवर शिजवून घ्या. यामुळे कैरीचा नैसर्गिक आंबटपणा आणि पोषक तत्व टिकून राहतात. कैरी जास्त मऊ होईपर्यंत शिजवा जेणेकरून तिचा गर सहज निघेल.

फक्त साखर किंवा गूळ वापरण्यापेक्षा दोन्ही समप्रमाणात वापरा. गुळामुळे पन्हाला छान दाटपणा आणि गडद रंग येतो, तर साखरेमुळे त्याची चव बॅलन्स होते.

पन्ह बनवताना त्यात ताजी कुटलेली वेलची आणि जायफळ पावडर आवर्जून टाका. जायफळमुळे पन्हाला एक विशिष्ट सुवास येतो जो मनाला प्रसन्न करतो आणि चव देखील अप्रतिम लागते.

पन्हाला 'चटपटीत' बनवण्यासाठी त्यात घरी भाजलेल्या जिऱ्याची पूड टाका. जिऱ्यामुळे पन्ह पचायला हलकं होतं आणि त्याची चव कित्येक पटीने वाढते.

साध्या मिठाऐवजी काळ्या मिठाचा वापर करा. हे मीठ पन्हाला एक वेगळीच अप्रतिम चव देतं आणि उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर असतं.

पन्ह सर्व्ह करताना त्यात पुदिन्याची ४ ते ५ पाने वाटून त्याचा रस मिसळा. यामुळे पन्ह्याला एक 'कूलिंग इफेक्ट' मिळतो आणि चव अधिक रिफ्रेशिंग लागते.

जर तुम्हाला राजेशाही चव हवी असेल, तर थोड केशर कोमट पाण्यात भिजवून पन्ह्यात मिक्स करा. यामुळे पन्ह्याला सुंदर रंग आणि सुवास येतो.