Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:44 IST2025-09-30T17:37:19+5:302025-09-30T17:44:10+5:30
Anju Yadav : लग्नानंतर स्वप्न पाहणं सोडून देणाऱ्या सर्व महिलांसाठी ही यशोगाथा प्रेरणादायी आहे.

राजस्थानमध्ये डीएसपी म्हणून नियुक्त झालेल्या अंजू यादव यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोच्या एका बाजूला एक साधी गावातील महिला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला गणवेशातील एक आत्मविश्वासू, यशस्वी महिला दिसते.

अंजू यादव यांनीच हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामुळे देशभरातील महिलांना प्रोत्साहन मिळत आहे. लग्नानंतर स्वप्न पाहणं सोडून देणाऱ्या सर्व महिलांसाठी ही यशोगाथा प्रेरणादायी आहे.

हरियाणातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अंजू यादव आता राजस्थानमध्ये डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये त्या DSP झाल्या.

विधवा कोट्याअंतर्गत अंजू यादव यांनी २०२१ च्या राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षेत १७२५ वा रँक मिळवला, ज्याचा निकाल २०२३ मध्ये जाहीर झाला.

अंजू याचं २१ व्या वर्षी लग्न झालं होतं, कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि त्यागाच्या माध्यमातून, हरियाणाच्या अंजू यांनी केवळ या अडचणींना हसतमुखाने तोंड दिले नाही तर समाजात स्वतःची ओळख निर्माण केली.

पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतःला बळकट करण्यात यश मिळवले आणि सिंगल मदर असतानाही पोलीस अधिकारी झाल्या. अंजू यादव यांचा जन्म १९८८ मध्ये हरियाणाच्या नारमौल येथील धौलेदा गावात झाला. त्यांचे वडील लालाराम यादव शेतकरी आहेत आणि आई सुशीला देवी गृहिणी आहेत.

अंजू कोणत्याही मोठ्या शाळेत शिकल्या नाहीत तर गावातील सरकारी शाळेत गेल्या. तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतले, त्यानंतर सरकारी महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्यांना तीन बहिणी आहेत.

वडील सहा जणांच्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी किराणा दुकान चालवतात. आर्थिक अडचणी असूनही लालाराम यांनी आपल्या चार मुलींना मुलांसारखे वाढवले. एक मुलगी सध्या राजस्थानमध्ये डीएसपी आहे, दोन मुली खासगी कंपन्यांमध्ये उच्च पदांवर आहेत.

बीए पूर्ण केल्यानंतर, तिने २००९ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी राजस्थानमधील गंडाला गावात लग्न केलं. वयाच्या २४ व्या वर्षी मुलाला जन्म दिला. आई झाल्यानंतर अंजू यांना वकील व्हायचं होतं. परंतु सासरच्या लोकांकडून पाठिंबा मिळाला नाही.

माहेरी परतण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या पाठिंब्याने आणि स्वतःच्या कठोर परिश्रमाने, अंजू यादव यांनी तीन सरकारी नोकऱ्या मिळवल्या. २०१६ मध्ये मध्य प्रदेशातील भिंड येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षिका झाल्या.

२०२१ मध्ये अंजू यांचे पती नित्यानंद यांचं आजारपणामुळे निधन झालं. त्या काळात त्यांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेतली. त्याच वर्षी राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षा (RAS) २०२१ चे फॉर्म आले होते.

पतीच्या मृत्यूचं दुःख असूनही त्यांनी धाडस केलं आणि RAS फॉर्म भरला. प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी केली आणि यशस्वी झाल्या. त्यांच्या प्रतिभेने आणि कठोर परिश्रमाने अंजू यांनी सिद्ध केलं की, महिला कोणतीही गोष्ट साध्य करू शकतात.
















